12 August 2020

News Flash

जिल्ह्य़ात ऑनलाइन शिक्षणासाठी ‘डोनेट अ डिव्हाइस’ चळवळ

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा उपक्रम, जुने भ्रमणध्वनी दान करण्याचे आवाहन,

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा उपक्रम, जुने भ्रमणध्वनी दान करण्याचे आवाहन,

नाशिक : करोनाचे संकट असले तरी शिक्षण थांबून चालणार नसल्याने ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी भ्रमणध्वनी उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘डोनेट अ डिव्हाइस’ चळवळ सुरू केली आहे. घरी पडून असलेले जुने भ्रमणध्वनी दान करण्याचे आवाहन याव्दारे करण्यात आले आहे. बुधवारी या मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर तंत्रसेतु नाशिक हेल्पलाइन आणि विद्यावाहिनी रेडिओ या उपक्रमांनाही सुरुवात करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात सामाजिक अंतर पथ्याचे पालन करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आरोग्य शिक्षण सभापती सुरेखा दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महिला बालकल्याण सभापती अश्विनी आहेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर आदींच्या उपस्थितीत तीन उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनीही ऑनलाइन कार्यक्रमात सहभाग घेतला.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष क्षीरसागर यांनी शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनादेखील करोनाच्या या संकटकाळात दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेने हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले.  समाजातील सर्व घटकांनी ‘डोनेट अ डिव्हाइस’ उपक्रमांतर्गत आपल्याकडील जुने भ्रमणध्वनी, लॅपटॉप, संगणक, स्मार्ट टीव्ही दान करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनीही यामध्ये सहभागी व्हावे. तांत्रिक अडचणी असलेल्या ठिकाणी शिक्षकांमार्फत गटा-गटाने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. डोनेट अ डिव्हाइस उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य शिक्षण सभापती सुरेखा दराडे यांनी दोन नवीन अत्याधुनिक भ्रमणध्वनी, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक ज्ञानोबा केंद्रे यांनी नवीन भ्रमणध्वनी,  मुख्य लेखा वित्त अधिकारी महेश बच्छाव यांनीही एक भ्रमणध्वनी कार्यक्रमातच शासकीय कन्या शाळेतील विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनीही नवीन भ्रमणध्वनी देणार असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी ग्रामीण भागात भ्रमणध्वनी आणि इतर सामग्रीअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होत नसल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या चळवळी अंतर्गत विविध स्वयंसेवी संस्था तसेच लोकांना बनसोड यांनी आपले जुने भ्रमणध्वनी आणि अन्य साहित्य दान करण्याचे आवाहन केले.

आरोग्य शिक्षण सभापती दराडे यांनी ज्ञानासारख्या पवित्र कार्यात दानशूरांनी सुस्थितीतील उपकरणे दान करावीत, ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असे सांगितले. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी याबाबतच्या सूचना सर्व तालुक्यांना दिल्या असून मदतीसाठी विविध संस्था, संघटना यांच्याशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती दिली. कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंद पिंगळे, प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह ऑनलाइनव्दारे विविध मान्यवर उपस्थित होते.

असे आहेत शैक्षणिक उपक्रम

नाशिक शिक्षण हेल्पलाइन ही वाहिनी शैक्षणिक संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आली आहे. टेलिग्राम अ‍ॅपद्वारे तंत्रसेतू-नाशिक हेल्पलाइन हे नाव टाकून यात सहभागी होता येईल. सहभागासाठी मर्यादा नसल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना यात सहभागी होता येणार आहे. शालेय अभ्यासक्रम, विविध चित्रफिती याव्दारे दररोज विद्यार्थ्यांना पाठविण्यात येतील. तसेच विविध प्रश्नांची उत्तरे देण्याची व्यवस्थाही यात करण्यात आली आहे. विद्यावाहिनी रेडिओच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांकडे भ्रमणध्वनी उपलब्ध नाही, संपर्काची समस्या आहे. त्यांच्यासाठी नाशिक आकाशवाणीव्दारे शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. आकाशवाणी नाशिकच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांंना दररोज दोन तास याप्रमाणे सकाळ आणि संध्याकाळी कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. यासाठी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 12:12 am

Web Title: donate a device movement for online education in nashik district zws 70
Next Stories
1 ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेविषयी आठ महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन केंद्रे
2 दरोडय़ाच्या तयारीत असलेले पाच जण गजाआड
3 खरीप हंगामा अंतर्गत ७३ टक्क्य़ांहून अधिक पेरणी पूर्ण
Just Now!
X