भाषा आपली आत्मखूण असून तिचे अस्तित्व संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत. अशा स्थितीत भाषेत नवे प्रवाह येत असताना तिला विषबाधा होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी केले. ‘आज भाषेमध्ये सरमिसळ होत आहे, यासाठी आपण दु:खी होत आहोत. खरे तर अशा पद्धतीने व्यक्त होण्याची काहीही आवश्यकता नाही. इतर भाषांतूनही आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. कुठलीही भाषा प्रवेश कधीच नाकारत नाही. भाषेचा अभ्यास करताना ज्ञानाच्या खिडक्या उघड्या ठेवल्या तरच विश्वाचे दर्शन होईल. भाषेत आदानप्रदान अपेक्षित असताना एखादी भाषा आपल्यावर वरचढ होऊ देऊ नका. एखाद्या भाषेचे गुलामही होऊ नका. त्या भाषेचे सम्राट व्हा,’ असेही विजया राजाध्यक्ष यांनी म्हटले.

नाशिक येथील महाकवी कालिदास नाट्यगृह येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जनस्थान पुरस्कार सोहळ्यात डॉ. विजया राजाध्यक्ष बोलत होत्या. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे आहे. पुरस्कार सोहळ्यास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा, सपकाळ नॉलेज हबचे रविंद्र सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना डॉ. राजाध्यक्ष यांनी कुसुमाग्रज आणि त्यांची साहित्य संपदा, लेखणी शैली यांना उजाळा दिला. तसेच समकालीन साहित्यिकांच्या विविध कविता आणि सध्याची बहुतालची परिस्थिती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. ‘कुसुमाग्रज हे समकालीन तसेच साम्यवादी होते. त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता आजही त्यांच्या स्मृती त्या वास्तूत जाणवतात. कुसुमाग्रजांची कवितेवर निष्ठा होती, त्या निष्ठेसोबत त्यांचा करार असल्याने प्रतिभेने त्यांना आशिर्वाद दिला. कुसुमाग्रज नावाचे गारूड आमच्या पिढीवर होते. समकालीन अनेक साहित्यिक होते. मात्र प्रत्येकाची विचारधारा वेगळी होती. त्यात कुसुमाग्रजांची विचारधारा विशेष भावली,’ असे राजाध्यक्ष यांनी म्हटले. जनस्थान पुरस्कार हा माझ्यासाठी महत्वाचा आहे, असेही राजाध्यक्ष यांनी म्हटले.

मराठी भाषेच्या शाळा आज गरजेच्या आहेत. मराठी शाळांविषयी शासनाचे अनेक निर्णय घातक आहेत. मराठी भाषेच्या शाळा हा मुलांसाठी पाया असतो. प्रत्येक भाषेत अनुबंध राखणे शिक्षण विभागाचे काम असून भाषेविषयी आत्मियता निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकात सर्वसमावेशक लिखान घ्यावे अशी सूचना त्यांनी केली.