दि जिनियसनिर्मित आणि स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स अ‍ॅण्ड फॅशन डिझाइन प्रस्तुत ‘अंतर्वक्र भिंगातून पाहताना : नाटय़दर्शन’ या लघुनाटय़ महोत्सवाचे आयोजन शनिवारी सायंकाळी सहा वाजता परशुराम साईखेडकर नाटय़गृहात करण्यात आले आहे.

या महोत्सवाची सुरुवात दिवाकरांच्या निवडक नाटय़छटांनी होणार आहे. नाटय़ छटांच्या प्रांतातील निर्विवाद असे चक्रवर्ती सम्राट दिवाकर हे नाटय़छटेद्वारे मार्मिक विनोद, जगण्यातील विसंगती व तत्कालीन सामाजिक अन्यायाची जाणीव करून देतात. काव्यमय व चिंतनात्मक लिखाणातून लिहिलेल्या या नाटय़छटा आजही आपल्या समाज जीवनाचे प्रतिबिंब दाखवत आपलेच दर्शन घडवितात. सुयश लोथे, राजवर्धन दुसाने, चैतन्य देवरे, भूषण आहिरे, श्रद्धा उबाळे, ओवी भालेराव, पल्लवी ओढेकर, रिया हिंगणे, एकता आढाव आणि मनोज गुळवे हे कलाकार या नाटय़छटा सादर करणार आहेत. या नाटय़छटांचे दिग्दर्शन पूर्वा सावजी व सुहास जाधव यांनी केले आहे. यानंतर बीआरई गणेश तसेच ‘डिजिटल इंडिया – हॅँडल विथ केअर’ हे प्रहसन सादर होईल. अभिषेक रहाळकर, ओवी भालेराव, रिया हिंगणे, एकता आढाव यांनी यात अभिनय केलेला असून त्याचे दिग्दर्शन प्रतिक शर्मा आणि स्वराली हरदास यांनी केले आहे. या प्रहसनात नर्म विनोदी शैलीतून तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरीही माणसांच्या मूलभूत गरजा जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती झाली असे म्हणता येणार नाही हे दर्शविले गेले आहे. त्यानंतर ‘पिक्चर अभी बाकी है’ हे सुनील जाधव लिखित लघुनाटय़ सादर होईल. त्याचे दिग्दर्शन नीलेश सूर्यवंशी यांनी केले असून सैराट चित्रपटाच्या यशाने प्रभावित होऊन किशा आणि त्याचा दाजी १०० कोटी कमावून देणारा चित्रपट बनविण्याचा प्लॅन करतात आणि अर्धवट ज्ञान व त्यांना भेटलेले इरसाल नमुने यामुळे काय धमाल उडते ते त्यात दाखविले गेले आहे. यानंतर मराठी रंगभूमीवर अपवादानेच सादर होणारी लघुनाटय़ांची मालिका सादर होणार आहे.

नाटक, चित्रपट, मालिका यांच्या लिखाणाचा दांडगा अनुभव असणारे देवेन कापडणीस यांनी या लघु नाटकांचे लेखन केलेले असून चेतन वडनेरे, विश्वदीप यादव, अभिषेक रहाळकर, प्रतीक नाईक, प्रशांत सोनवणे, रिया हिंगणे, एकता आढाव यांनी या त्याचे दिग्दर्शन केले आहे. सरंजामी वृत्ती कशी जोपासली आहे यावर केलेले भाष्य, चौका-चौकातून तयार होणारे राजकारणी, भाई व त्यांनी पसरविलेली दहशत, जुनी माणसे जातात आणि नव्या मुखवटय़ांची माणसे येतात अशा त्यांचा आशय आहे.

कार्यक्रमात प्रकाश योजना रवी रहाणे, आदित्य रहाणे यांची असून संगीत तेजस बिल्दीकर, नेपथ्य गुलाब पवार, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा पल्लवी ओढेकर, सर्जनशील मदत दीपक गरुड, प्रीतम खैरनार, चंद्रकांत जाडकर, प्रसाद गर्भे यांची आहे. सूत्रसंचालन चेतन वडनेरे आणि पूर्वा सावजी करणार असून नाटय़दर्शन या लघुनाटय़ महोत्सवास प्रवीण काळोखे व रश्मी काळोखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या संपदा हिरे, चित्रपट दिग्दर्शक तानाजी घाडगे, मकरंद माने यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. नाटय़प्रेमींनी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.