आपल्या क्षमतांचा जागर करायचा असेल तर जीवनात स्वप्ने आवश्यक आहेत. कळत असो वा नसो मनुष्याला स्वप्ने पडायला हवीत. कारण स्वप्नच जीवनाच्या निरंतर यात्रेचे सोबती असतात, असे प्रतिपादन निरंतनकार विवेक घळसासी यांनी केले. सोलापूर जनता सहकारी बँक नाशिक शाखेच्या चवथ्या वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य न्यास येथे आयोजित ‘स्वप्न बघा-स्वप्ने जगा’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर, बँकेचे अध्यक्ष किशोर देशपांडे, संचालक मुकुंद देवधर व अविनाश सरवदे उपस्थित होते. माणसाच्या जीवनात स्वप्नांचा ठसा जशाच्या तसाच उमटत असतो. त्यामुळे बघितलेली स्वप्न इतरांना पटवून देता आली पाहिजे. स्वप्न बघितली तरच आयुष्यातील अपेक्षित ध्येय गाठता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी बँकेच्या प्रगतीबरोबर सामाजिक कामातील सहभाग आणि यशोगाधा सांगितली. गोविलकर यांनी बँकेच्या ५० वर्षांच्या वाटचालीचे कौतुक करताना बँकेचे ग्राहकांशी दृढ होत असलेल्या भावनिक नात्याचे कौतुक केले. या वेळी शहरातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. त्यात सिंहस्थात सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या भारत भारतीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, पाणी प्रयोगासाठी सृष्टी नेरकर, भाषेच्या सहयोगाबद्दल सुनील खांडबहाले, आयटी क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल पीयूष सोमाणी, खेळातील नैपुण्याबद्दल नंदकुमार उगले यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल सोनवणे यांनी केले, तर स्वागत शाखाधिकारी सुनील पटेल यांनी केले.