नगरसेविकांना पैठणीचा साज, तर नगरसेवकांना फेटय़ांचा थाट!

महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक मंगळवारी सकाळी ११ वाजता नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत होत आहे. भाजपने विजयोत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्याची तयारी केली आहे. त्यात विशेष असा ‘ड्रेसकोड’ ठेवण्यात आला आहे. नवनिर्वाचित नगरसेविका आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना खास भगव्या रंगातील पैठणी, तर पुरुष नगरसेवकांसाठी केवळ फेटा असा पोशाख असणार आहे.

पालिकेत सर्वाधिक म्हणजे ६६ जागा जिंकणाऱ्या भाजपने जादूई आकडा स्वबळावर ओलांडला आहे. त्यांना कोणाच्या मदतीची गरज नाही. मुंबईत भाजपने सेनेला मतदान केले होते. मात्र, नाशिकमध्ये शिवसेना भाजपला मतदान करणार नाही. या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका सेनेने आधीच जाहीर केली आहे. शिवसेनेचे ३५ सदस्य आहेत. त्याचप्रमाणे पाच सदस्यीय मनसेनेदेखील तटस्थ राहण्याचे सूतोवाच केले आहे.

भाजप आणि काँग्रेस आघाडी यांच्यात सामना होणार असला तरी तो एकतर्फी असेल. काँग्रेस आघाडीचे संख्याबळ जेमतेम बारा आहे. मतदान झाले तरी भाजपला काडीमात्र फरक पडणार नाही. महापौर पदासाठी भाजपच्या रंजना भानसी आणि काँग्रेस आघाडीच्या आशा तडवी यांच्यात, तर उपमहापौर पदासाठी भाजपचे प्रथमेश गीते आणि आघाडीच्या सुषमा पगारे यांच्यात निवडणूक होईल. विरोधी अस्तित्व कायम ठेवण्यासाठी काँग्रेस आघाडी निवडणूक लढवत आहे. स्वत:च्या जोरावर बहुमताचा पल्ला ओलांडल्याने भाजपने विजयोत्सव दिमाखात साजरा करण्याची तयारी केली आहे. त्याकरिता पालकमंत्री गिरीश महाजन, स्थानिक आमदार, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, विभागीय संघटनमंत्री रवी काळकर आदी उपस्थित राहणार आहेत.

महापालिकेत विशेष सभेआधी सकाळी ८.३० वाजता भाजप नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटीतील स्वामी नारायण मंदिरात ही बैठक होईल. या वेळी ज्येष्ठ नेते व पदाधिकारी मतदान प्रक्रिया व महापालिकेतील कामकाजाविषयी सर्वाना मार्गदर्शन करतील. या वेळी पक्षादेश बजावला जाईल. भाजपच्या एकूण नगरसेवकांमध्ये ३४ महिला आहेत. या नगरसेविकांसह महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी पक्षाने खास ५० हून अधिक पैठण्यांची खरेदी केली. त्यांचे वितरणही आधीच करण्यात आले.

‘पारदर्शक’ कारभारासाठी मंथन

खुद्द मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महापालिकेत पारदर्शक कामकाजाचे दर्शन घडविण्याची जबाबदारी सत्ताधारी भाजपची आहे. मुंबई पालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपने उपलोकायुक्त नेमण्याचे जाहीर केले. त्याच धर्तीवर नाशिकमध्येदेखील पारदर्शक कारभारासाठी ही व्यवस्था अमलात आणण्याची मागणी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने आधीच केली आहे. निवडणूक प्रचारात भाजपने पारदर्शक कारभाराचा बराच गवगवा केला. हाच आता प्रतिष्ठेचा मुद्दा करण्याची तयारी विरोधकांनी केली आहे; परंतु विरोधकांना या मुद्दय़ावर चोख उत्तर देण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रदीर्घ काळानंतर नाशिककरांनी प्रथमच एकाच पक्षाच्या म्हणजे भाजपच्या हाती सत्ता सोपविली. पालिकेतील कारभार पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी काही बदल करण्यावर विचारमंथन चालविले आहे.

फेटय़ांबाबत संभ्रम

मंगळवारी सर्व नगरसेविका आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी पैठणीच्या ‘ड्रेसकोड’मध्ये दिसतील, असे ज्येष्ठ महिला नगरसेविकांकडून सांगण्यात आले. महिलांसाठी पैठण्या खरेदी करणाऱ्या भाजपने पुरुष नगरसेवकांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. त्यांना एकसमान गणवेशाकरिता अशी कोणतीही भेट दिली गेली नाही. स्वामी नारायण मंदिरात बैठक झाल्यानंतर नगरसेवकांना फेटे बांधले जातील. नगरसेविकांना फेटे आहेत की नाही, याबद्दल महिला वर्गात संभ्रम आहे. पंचवटीतून साडेदहा वाजता बसने सर्व नगरसेवक महापालिकेत येतील, असे वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले.