गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी विविध उपक्रम

नाशिक : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या १२६ पैकी ३६ शाळांचे पटसंख्येअभावी विलीनीकरण करण्यात आले असून आता महापालिकेच्या शाळा कात टाकणार आहेत. शहर परिसरात सध्या ९० महापालिका शाळांमध्ये शाळांचा गुणात्मक दर्जा वाढावा यादृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

महापालिका शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात अनेकदा आवाज उठविण्यात आला. या पाश्र्वभूमीवर गुणात्मक दर्जा प्राप्त करावा यासाठी शिक्षण विभागाच्या १२६ शाळांपैकी ज्या शाळांमधील पटसंख्या कमी, एकाच परिसरात एकापेक्षा जास्त शाळा आणि पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध आहेत अशा ३६ शाळांचे विलीनीकरण करण्यात आले आहे.

शालेय पोषण आहार वेळापत्रकानुसार आणि स्वच्छ, गुणवत्तापूर्ण देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकण्यात आली आहे. शाळेतील अंतर्गत दुरुस्तीसाठी सर्वशिक्षा अभियानातील काही रक्कम वापरावी, परंतु मोठी दुरुस्ती असल्यास बांधकाम विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम करण्यात येईल. विद्यार्थ्यांना साथीचा आजार होऊ नये यासाठी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची टाकी आणि परिसराची नियमित स्वच्छता, विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास तसेच त्यांना शैक्षणिक संकल्पना स्पष्ट व्हाव्यात या दृष्टीने शालेय शैक्षणिक, संगणक आणि खेळाचे साहित्य सुस्थितीत ठेवत त्याचा दैनंदिन कामकाजात वापर करण्यात येणार आहे.

दरम्यान, शिक्षकांच्या रजेबाबत लेखी पत्र अनिवार्य करत मुख्याध्यापकांच्या पूर्वपरवानगीशिवाय शिक्षकांना रजा घेता येणार नाही. शालेय समितीच्या बैठका नियमितपणे घेऊन त्याचे इतिवृत्त अद्ययावत करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

शिक्षकांना गणवेश, भ्रमणध्वनी वापरावर बंदी

विद्यार्थी आणि शिक्षकांची ओळख पटावी यासाठी शिक्षकांसह मुख्याध्यापकांना गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे. मुख्याध्यापकांव्यतिरिक्त शिक्षकांना भ्रमणध्वनी वापरावर बंदी घालण्यात आली आहे. शिक्षकांनी आपले भ्रमणध्वनी शाळा सुरू होण्यापूर्वीच मुख्याध्यापकांकडे जमा करावे. वर्ग स्वच्छता, कागदपत्रे, विद्यार्थी लाभार्थी योजना, विद्यार्थी ऑनलाइन नोंदीविषयक जबाबदारी त्या त्या वर्गाच्या वर्गशिक्षकांना देण्यात आली आहे.

वेळेचे नियोजन

शाळांमध्ये भौतिक सुविधा देत असताना इमारतीत एकच शाळा भरत असल्यास शाळेची वेळ सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी दोन तसेच शनिवारी सकाळी आठ ते ११ अशी करण्यात येईल. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दोन वेळा मधली सुटी दिली जाईल. एकच इमारत असताना दोन सत्रांत शाळा भरत असल्यास सकाळ सत्रातील शाळा सकाळी ७.१५ ते दुपारी १२.१५ आणि शनिवारी ७.१५ ते १०.१५ अशी राहील. दुपार सत्रासाठी १२.३० ते ५.३० आणि शनिवारी दुपारी १२.३० ते ३.३० अशी वेळ करण्यात येईल.