स्पर्धा परीक्षा व बँक क्षेत्रातील मराठी टक्का वाढविण्यासाठी येथे शिवसेनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून जुलमध्ये होणाऱ्या स्टेट बँकेतील क्लार्कच्या १७ हजार व इतर २,२०० अशा १९,२०० पदांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी येथे मुंबईच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय मोफत मार्गदर्शन शिबिराचा १६ मे रोजी समारोप होणार आहे.

शिवसेनेच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात याआधी एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे स्थानीय लोकाधिकार समिती मुंबई महासंघाचे अध्यक्ष खा. गजानन कीर्तीकर, कार्याध्यक्ष खा. आनंद अडसूळ, सरचिटणीस अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख अजय बोरस्ते, स्थानीय लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष अनिल,स्टेट बँक स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस हेमंत रासम यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथील स्थानीय लोकाधिकार समितीचे सदस्य तसेच बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत नाशिक येथे १४ ते १६ मे या कालावधीत तीन दिवस विविध विषयांवर मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी शैलेश माळी यांनी गणित या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रविवारी रोहित शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. सोमवारी इंग्रजी या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली आहे.