कारखान्याची आग २४ तासानंतर आटोक्यात

गोंदे औद्योगिक वसाहतीत एआरएस बायोफिल या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यात उसळलेला आगडोंब अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर २४ तासानंतर नियंत्रणात आला. आगीत टाक्यांमधील दीड लिटर इथेनॉल व कच्चा माल भस्मसात झाला. जवळपास ७० फूट उंचीच्या टाकीवर वरून काहीतरी आदळल्याने आग लागल्याचा अंदाज आहे. संबंधित वस्तू आदळल्यामुळे स्फोटासारखा जोरदार आवाज झाला आणि तीन टाक्यांवरील अवजड झाकणे इतरत्र फेकली गेली. तोफगोळ्याच्या सरावावेळी गोळा पडून आग लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे असले तरी आग विझविणाऱ्या यंत्रणांनी मात्र तसे कोणतेही कारण स्पष्ट केले नाही.

इगतपुरी तालुक्यातील अस्वली रस्त्यावर एआरएस कारखान्यात लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलास संपूर्ण एक दिवस झुंज द्यावी लागली. बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जोरदार आवाज होऊन कारखान्यात आग लागली. क्षणार्धात एका टाकीने पेट घेतला. आगीचा रौद्रावतार पाहून नाशिक महापालिका, एमआयडीसीसह भारत पेट्रोलियम, जिंदाल, महिंद्रा, एचएएलच्या फोमच्या गाडय़ा मागविण्यात आल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. टाकीत इथेनॉलचा मोठा साठा होता. आसपासच्या टाक्यांमध्ये इथेनॉल निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल होता. ज्वलनशील पदार्थाच्या साठय़ामुळे आग नियंत्रणात आणण्यास अडचणींना तोंड द्यावे लागत होते. पाणी व फोमचा मारा करूनही आग भडकत राहिली.

गुरूवारी सकाळी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन नव्याने नियोजन केले. फोमचा मारा अचूक होत नसल्याचे लक्षात घेऊन शिडीद्वारे चढून नव्याने मारा करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार केलेल्या कार्यवाहीमुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. इथेनॉलच्या टाक्या तप्त असल्याने त्या पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यामुळे तापलेल्या टाक्यांवर पाण्याचा मारा करून त्या थंड करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. चोवीस तासात टाकीतील सुमारे दीड लाख लिटर इथेनॉल भस्मसात झाले. त्याची किंमत एक कोटीहून अधिक असल्याचे सांगितले जाते.

आग एकाच टाकीस लागली असली तरी जेव्हा आवाज झाला, तेव्हा तिन्ही टाक्यांवरील अवजड झाकणे इतरत्र फेकली गेली. एक झाकण कारखान्याच्या बाहेर १०० मीटरवर जाऊन पडले होते. या एकंदर घटनाक्रमानंतरही आगीच्या नेमक्या कारणांची स्पष्टता झालेली नाही. देवळालीच्या तोफखाना स्कूलतर्फे तोफांचा सराव केला जातो. स्कूलच्या फायरिंग रेंजचा भाग आसपासच्या काही भागापर्यंत पसरलेला आहे. तोफगोळ्यांच्या सरावावेळी एखादा गोळा इथेनॉल कारखान्यात येऊ आदळला असावा, अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. अग्निशमन यंत्रणांनी आगीच्या कारणाची स्पष्टता केली नाही.