चारूशीला कुलकर्णी

करोनाची चाहुल लागताच राज्यात पहिल्या टप्प्यात शाळा, महाविद्यालये बंद करून परीक्षा स्थगित करण्यात आल्या. प्राथमिक विभागाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा आदेश असला तरी हे गुणदान कसे व्हावे, याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेकडून येणाऱ्या सुचनांकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपालिका, खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. परीक्षा रद्द करतांना विद्यार्थ्यांना एकूण वार्षिक अहवालावरून सरासरी गुण देण्यात यावे, अशी सुचना असली तरी नेमका कोणता पर्याय अवलंबविण्यात यावा, याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. मे महिन्यात वार्षिक परीक्षांचे निकाल जाहीर करून पुढील शैक्षणिक वर्षांचे नियोजन सुरू होते. सध्या सर्वत्र टाळेबंदी आहे. हा कालावधी तीन मेपर्यंत असतांना शिक्षण विभागाकडून मूल्यांकन कसे करावे, एक मे रोजी होणारा महाराष्ट्र दिन कसा साजरा करावा, अशा वेगवेगळ्या शंका उपस्थित होत आहेत. शिक्षण विभागाने २०१०च्या शासकीय निर्णयानुसार शैक्षणिक वर्षांतील सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात ‘आकरिक’ आणि ‘संकलित’ मूल्यमापनद्वारे मूल्यमापन करण्यात येते. यामध्ये मराठी,  हिंदी,  इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास,  सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील दोन्ही सत्रातील आकरिक आणि संकरित मूल्यमापन याचा विचार करत एकूण गुणांचे मूल्यमापन होते. यंदा करोनामुळे वार्षिक परीक्षा झाल्या नसल्याने संकरित मूल्यमापनास अडचणी येणार आहेत. पर्यायाने आकरिक मूल्यमापनानुसारच गुणदान व्हावे अशी शिक्षकांची मागणी आहे. अद्याप याबाबत शिक्षण विभागाकडून कुठल्याही प्रकारची सुचना न आल्याने टाळेबंदीनंतर शाळेत निकालाविषयी विचारणा झाली तर काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.  याविषयी खासगी प्राथमिक महासंघाचे अध्यक्ष नंदलाल धांडे यांनी शिक्षकांना मूल्यमापनाच्या गुणांवर सरासरी गुण काढून सत्र दोनचा निकाल लवकर जाहीर करता येईल, असे सांगितले. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत. मात्र पुण्याहून पत्रक निघणार असल्याने अद्याप याविषयी चित्र स्पष्ट नसल्याचे धांडे यांनी नमूद केले.

आकरिक मूल्यमापन म्हणजे काय?

दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, प्रात्यक्षिक, प्रयोग, उपक्रम कृती, प्रकल्प, चाचणी परीक्षा यांचा समावेश असणाऱ्या मूल्यमापनाला आकरिक म्हटले जाते. सर्व शाळांतील पहिल्या सत्रातील आकरिक, संकलित मूल्यमापन पूर्ण झाले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेकडून सूचनेची प्रतिक्षा

साधारणत प्रथम आणि द्वितीय सत्रात आकरिक आणि संकरित मूल्यमापनानुसार निकाल जाहीर होतो. दुसऱ्या सत्रातील परीक्षा न झाल्याने आकरिक पर्याय योग्य आहे. या मध्ये विद्यार्थ्यांच्या दैंनदिन नोंदी, अभ्यासातील प्रगती नोंदवली जाते. विषय अहवाल प्राप्त होतो. मात्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेकडून अद्याप याविषयी सुचना आलेली नाही.

– डॉ. वैशाली झनकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक