News Flash

नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयासाठी ६२७ कोटींचा खर्च अपेक्षित

महाविद्यालयासाठी ४४८ तर रुग्णालयासाठी ९८६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यासाठी तब्बल ६२७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महाविद्यालयासाठी ४४८ तर रुग्णालयासाठी ९८६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

नाशिक येथे २२ वर्षांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठामार्फत विविध आरोग्य विज्ञानाचे अभ्यासक्रम राबविले जातात. तथापि आजतागायत विद्यापीठाची स्वत:ची पदवी आणि पदव्युत्तर संस्था स्थापन होऊ शकली नव्हती. ही उणिव या महाविद्यालय, पदव्युत्तर शिक्षण-संशोधन संस्थेच्या माध्यमातून दूर होणार आहे. रखडलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आग्रह धरला होता. गेल्या फेब्रुवारीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता मिळाली होती. या संदर्भात शासन निर्णय झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आरोग्य विद्यापीठाच्या अखत्यारीत महाविद्यालय, रुग्णालय स्थापन होणार आहे. त्याचे पर्यवेक्षण, व्यवस्थापन व नियंत्रण विद्यापीठाकडून होईल. या महाविद्यालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभागास तात्पुरत्या स्वरूपात नि:शुल्क वापरास देण्यात येणार आहे. प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे रुपये ६२७.६२ कोटी (यात अनावर्ती खर्च ३८३.११ कोटी तर प्रथम चार वर्षासाठी आवर्ती खर्च २४४.५१ कोटी) अपेक्षित आहे. विद्यापीठ अभ्यासक्रम व इतर शुल्क निश्चित करेल. या महाविद्यालयासाठी आरोग्य विद्यापीठ शासन मान्यतेने आवश्यक पद निर्मिती करून ती भरणार आहे. महाविद्यालयासाठी ४४८ तर रुग्णालयासाठी ९८६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

महाविद्यालय, रुग्णालयाच्या बांधकामासाठी २६३.११ कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. यंत्रसामग्री आणि उपकरणांसाठी १२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. केंद्रीय वित्त मंत्रालयाने नव्याने घोषित केलेल्या योजनेमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास खासगी भागीदार गृहीत धरून या वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय उभारणीसाठी उपयोजना दोन अंतर्गत अनावर्ती खर्चासाठी ४० टक्के व्यवहार्यता तफावत निधी उपलब्ध करून देण्याबाबत आणि प्रथम पाच वर्षांसाठी आवर्ती खर्चासाठी २५ टक्के व्यवहार्यता तफावत निधी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासन/निती आयोगास ‘नाविण्यपूर्ण विशेष बाब’ म्हणून प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

१५ विषयांत पदव्युत्तर पदवी, ६४ प्रवेश क्षमता

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. तिचे महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था हे नांव निश्चित करण्यात आले आहे. या संस्थेमार्फत वैद्यकीय शिक्षण अध्यापनाची पध्दत विकसीत करण्यात येईल. तसेच विविध शाखांतील वैद्यकीय विशेषज्ञांची निर्मिती करण्यावर भर दिला जाईल. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची ६४ प्रवेश क्षमता राहील. एकूण १५ विषयांमध्ये औषधशास्त्र, शल्य चिकित्सा शास्त्र, भूलशास्त्र, रोगनिदान शास्त्र, स्त्रीरोग चिकित्सा व प्रसुती शास्त्र यांच्यासाठी प्रत्येकी सहा जागा, बालरोग चिकित्सा, अस्थिरोग, कान नाक घसा शास्त्र, नेत्रचिकित्सा, क्ष किरण, त्वचारोग, सूक्ष्मजीवशास्त्र यासाठी प्रत्येकी चार जागा असतील. जैवरसायन, औषध निर्माण, न्यायवैद्यक शास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी दोन जागा असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:19 am

Web Title: expenditure of rs 627 crore is expected for government medical college and hospital nashik abn 97
Next Stories
1 प्राणवायूसज्ज खाटांसाठी धावपळ
2 करोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत ज्येष्ठांचे प्रमाण सर्वाधिक 
3 केवळ रुग्णालयातील रुग्णांनाच रेमडेसिविर
Just Now!
X