26 November 2020

News Flash

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या बनावट लाभार्थ्यांना वसुलीसाठी नोटीस

अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही योजना दिलासादायक ठरली.

(संग्रहित छायाचित्र)

तब्बल एक हजार ३७ शेतकरी अपात्र; एक कोटी ५४ हजार रुपयांच्या वसुलीसाठी नोटीस

नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या बागलाणमधील तब्बल एक हजार ३७ शेतकऱ्यांना संबधित विभागाने अपात्र ठरविले आहे. त्यांना एकूण एक कोटी ५४ हजार रुपये वसुलीसाठी नोटीस बजावल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शासनाने २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबास वार्षिक तीन समान हप्त्यात सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. बागलाण तालुक्यात तब्बल एक लाखाहून अधिक खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी ५८ हजार शेतकऱ्यांना शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे. या योजनेचा सर्वाधिक फायदा करोनाच्या महासंकट काळात गरीब शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही योजना दिलासादायक ठरली.

दरम्यान ऐन दिवाळीच्या तोंडावर महसूल यंत्रणेने अचानक बागलाण तालुक्यातील १०३७ लाभार्थी शेतकऱ्यांना अपात्र ठरवून वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अनेकांनी लाभ घेतला असला तरी या योजनेच्या निकषाप्रमाणे लाभ घेतलेले शेतकरी अपात्र असल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

नोकरदार असूनही त्यांच्या नावावर शेती असे शेतकरी, निवृत्त शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी, प्राप्तीकर भरणारे, मयत लाभार्थी आदींना अपात्र ठरविण्यात आले असून नोटीस बजावल्यानंतर अपात्र शेतकऱ्यांनी पैसे परत न केल्यास उताऱ्यावर बोजा चढविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यात २०३ अपात्र लाभार्थी असून ८३४ प्राप्तीकर भरणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

लाभ घेतलेल्या बहुतांश लाभाथ्र्यांना नोटीस देऊन अन्याय केला आहे. सुराणे येथील भाऊसाहेब अहिरे यांच्याकडे एक हेक्टर ९६ गुंठे जमीन आहे. त्यांच्या घरात कोणीही नोकरीला नाही किंवा ते प्राप्तकर भरत नाहीत. ना कोणत्या बँकेत त्यांनी मुदत ठेव ठेवलेली आहे. असे असतांना त्यांना अपात्र ठरवून त्यांच्याकडून १० हजार रुपयांची वसुली केली आहे. ते पात्र असतांना कोणतीही चौकशी न करता तलाठ्याकडून त्यांना बोजा चढविण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार त्यांनी केली.

दरम्यान, सबंधित विभागाने पीएम किसान सन्मान निधी वसुलीच्या नोटीस दिल्या आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाता चौकशी करून तांत्रिक बाबींची पूर्तता करावी, जेणेकरून लाभ घेता येईल. संबधित अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आमदार दिलीप बोरसे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अपात्रतेबाबत संबधित विभागानेच महसूल यंत्रणेला याद्या सादर केल्या आहेत. त्यानुसार कारवाई केली जात आहे. ज्या कोणी शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई होत असेल अशा शेतकऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत.

– जितेंद्र इंगळे (तहसीलदार, सटाणा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:42 am

Web Title: fake of pm kisan sanman nidhi notice for recovery of fake beneficiaries akp 94
Next Stories
1 बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी बालिके चा अखेर मृत्यू
2 नाशिक जिल्ह्य़ाच्या स्वच्छता कार्यक्रमाला दाद
3 निधीच्या मुद्दय़ावरून काँग्रेसमध्ये अन्यायाची भावना नाही -थोरात
Just Now!
X