अंतिम घटकेत मोर्चात सहभागी; आदिवासींची पायपीट, तर समृद्धीबाधित शेतकरी वाहनाने रवाना

मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करणाऱ्या किसान सभेच्या मोर्चाला नाशिकहून मुंबईपर्यंत पोहोचताना विराट स्वरूप प्राप्त झाले. ही बाब लक्षात घेऊन इगतपुरी-सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी सोमवारी आठ ते दहा वाहनांनी मुंबईकडे कूच करीत आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नाशिकहून सुरू झालेल्या मोर्चात प्रारंभी सहभागी न होणाऱ्या अनेकांना तो मुंबईत दाखल झाल्यानंतर सहभागी होण्याची उपरती झाल्याचे दिसून आले. आदिवासींची पायपीट झाली तर समृद्धीबाधित शेतकरी सोमवारी खासगी वाहने आणि रेल्वेने मुंबईला मार्गस्थ झाले. आदिवासी शेतकरी आणि इतर शेतकरी यांच्यातील फरक या निमित्ताने अधोरेखित झाला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मागील आठवडय़ात किसान सभेच्या मोर्चाला नाशिकहून सुरुवात झाली. अधिवेशन सुरू असल्याने मुंबईत विधानभवनाला घेराव घालण्याचे किसान सभेने जाहीर केले. वर्षभरापूर्वी नाशिकमधून शेतकरी संपाचे मोठे आंदोलन उभे राहिले होते. शेतकरी सुकाणू समितीच्या छताखाली राज्यातील ४० हून अधिक संघटना एकत्रित आल्या होत्या. अंतर्गत बेबनावामुळे ही समिती बरखास्त झाली. यामुळे किसान सभेच्या मोर्चापासून इतर शेतकरी संघटनांनी अंतर राखले असताना किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले, माकपचे आ. जिवा पांडू गावित हे सुमारे १२ हजार शेतकऱ्यांना घेऊन मुंबईकडे मार्गस्थ झाले.

या आंदोलनास काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेसह शेकापने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक विभागीय हल्लाबोल मोर्चाचा तीन दिवसांपूर्वी नाशिक येथे जाहीर सभेने समारोप झाला. त्यासाठी नाशिककडे येणाऱ्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना लाल बावटय़ाच्या भव्य मोर्चाचे दर्शन घडले. सभेतच प्रमुख नेत्यांनी किसान सभेच्या मोर्चाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.

सोमवारी सकाळी संघर्ष समितीचे राजू देसले, सोमनाथ वाघ आदींच्या नेतृत्वाखाली शेतकरी शालिमार चौकात जमले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत शेतकरी १० ते १२ वाहनांमधून मुंबईकडे मार्गस्थ झाल्याचे देसले यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने काहीही केले नाही. प्रस्तावित महामार्गाबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

यामुळे १० जिल्ह्य़ातून एक हजार शेतकरी मुंबईतील मोर्चात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. काही गावांमधून शेती वाचवा-शेतकरी वाचवा, सुपिक जमिनी वाचवा आदी फलक हाती घेऊन शेतकरी घोषणाबाजी करीत वाहनांनी मुंबईकडे रवाना झाले.

हात आखडता घेणारेही मोर्चात सहभागी

मोर्चात सहभागी झालेले शेतकरी प्रामुख्याने पेठ, हरसूल, सुरगाण्यासह आदिवासी भागातील आहेत. सलग सहा दिवस रणरणत्या उन्हात पायपीट करत निघालेले मोर्चेकरी जसे पुढे मार्गस्थ झाले, तसतसे नाशिकसह ठाणे, पालघर आणि इतर आदिवासी भागातील शेतकरी मोर्चात सहभागी होऊ लागले. ठाण्यापर्यंत पोहोचताना मोर्चेकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली. मुंबईत धडकलेल्या लाल बावटय़ाच्या वादळाची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यावर मोर्चापासून हात आखडता घेणाऱ्यांना त्यात सहभागाची आवश्यकता वाटू लागली. समृद्धी महामार्गाविरोधात वर्षभरापासून काही बाधीत गावातील शेतकरी आंदोलन करीत होते. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) एकनाथ शिंदे यांनी आंदोलक शेतकऱ्यांची नाशिक येथे भेट घेऊन विरोध मावळल्याचे जाहीर केले होते. संबंधितांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. या घडामोडीमुळे समृद्धीबाधित शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आल्याची चर्चा सुरू असताना सोमवारी सिन्नर, इगतपुरी तालुक्यातील काही शेतकरी मुंबईतील मोर्चात सहभागी होण्यासाठी मार्गस्थ झाल्याचे पाहण्यास मिळाले.