कादवा काठावर भीतीची छाया

नाशिक : शहरी भागात बिबटय़ाने शिरकाव करत धुमाकूळ घातल्याची घटना ताजी असतानाच आता कादवा काठावरील काही गावात बिबटय़ाच्या पाऊलखुणा आढळल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबटय़ाने वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून या पाश्र्वभूमीवर, वन विभागाने परिसरात दोन पिंजरे लावून बिबटय़ाला जेरबंद करण्याची तयारी केली आहे. बिबटय़ाच्या धास्तीने रात्री रंगणारे गप्पांचे फड आणि शेकोटय़ाही बंद झाल्या आहेत.

निफाड तालुक्यातील गोदा काठच्या गावांमध्ये बिबटय़ाचा नेहमीच वावर असतो. उपरोक्त भागात बिबटय़ाच्या हल्ल्यात काही लहानग्यांना प्राण गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. अलीकडेच सावरकरनगरमध्ये नागरी वसाहतीत शिरलेल्या बिबटय़ाला जेरबंद करताना यंत्रणांना बरीच कसरत करावी लागली. बिबटय़ाच्या हल्ल्यात चौघे जखमी झाले होते. तत्पूर्वी मखमलाबाद शिवारात बिबटय़ाने महाविद्यालयीन युवकावर हल्ला केला होता. आता पिंपळगाव बसवंत परिसरातील चिंचखेड, उंबरखेड भागात बिबटय़ाची धास्ती पसरली आहे.  द्राक्ष मळ्यांचा हा सर्व परिसर. मळ्यातील घरांमध्ये शेतकरी वास्तव्यास आहेत. रानमळा परिसरात बिबटय़ा दिसल्याचे काही शेतकरी सांगतात तर काही शेतात बिबटय़ाच्या पायाचे ठसे स्पष्ट दिसल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. बेहेड, नारायण टेंभी, लोणवाडी, कारसूळ गावातही ही स्थिती आहे. सोमवारी सकाळी उसाच्या शेतात संतोष वराडे यांना बिबटय़ा दिसला. रात्री निफाड रस्त्यावर राहुल मोरे यांना त्याचे दर्शन घडले. रात्री अण्णा मोरे यांच्या वासरावर बिबटय़ाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संरक्षक जाळीमुळे वासरू बचावले. काही तरुणांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली.  बिबटय़ा आल्याच्या चर्चेने रानमळा परिसरात शुकशुकाट पसरला असून रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या गप्पा, शेकोटय़ा बंद झाल्या आहेत. रानमळा भागात सर्वच शेतकऱ्यांचे द्राक्ष बागेलगत निवासस्थान आहे. शेतात काम करणारे कामगार, त्यांची लहान मुले यांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकऱ्यांकडे गाई-म्हशी, पाळीव कुत्रे आहेत. बिबटय़ा जेरबंद होत नाही, तोवर लहान मुलांसह जनावरांच्या जीवाला धोका आहे. यामुळे वन विभागाने शोध मोहीम राबवून बिबटय़ाला जेरबंद करावे आणि घबराट दूर करावी, अशी मागणी दिलीप मोरे, विश्वास मोरे आदींनी केली आहे.