संरक्षणमंत्र्यांना शेतकऱ्यांचे साकडे
तोफखाना दलाच्या सराव व अभ्यासासाठी इगतपुरी तालुक्यातील मौजे धामणगाव व गंभीरवाडी गावातील शेतजमिनी संपादित करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी धामणगाव ग्रुप ग्रामपंचायतीने संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे केली आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आपल्या मागणीचे निवेदन संरक्षणमंत्र्यांना पाठविले आहे.
मौजे धामणगाव, गंभीरवाडी व परिसरातील शेतजमीन तोफखाना दलाच्या सरावासाठी भूसंपादित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतीला पत्र पाठविले आहे. वास्तविक, धामणगाव ही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत अनुसूचित जमाती क्षेत्रात येते. ग्रामसभेत भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविण्यात आला. या शेत जमिनींवर आदिवासी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्या संपादित केल्यास स्थानिक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या जमिनींवर अवलंबून असणाऱ्यांना स्थलांतर करावे लागेल. याआधी धामणगाव व गंभीरवाडी येथील शेत जमिनी मुंबई-मनमाड इंधनवाहिनी, दारणा धरण, घोटी-शिर्डी महामार्ग, एकलहरे वीजवाहिनी, जलवाहिनी आदी कारणांसाठी संपादित करण्यात आल्या आहेत. ग्रामसभेत धामणगाव व गंभीरवाडी येथील शेतजमिनी युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना सरावासाठी कधीही देऊ नये असा निर्णय घेण्यात आला. या आशयाचे निवेदन संरक्षणमंत्र्यांना देण्यात आले. या संदर्भात शुक्रवारी शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडणार आहेत.