रुग्णवाहिकेमुळे ९ हजारांपेक्षा अधिक करोनाग्रस्तांवर वेळेत उपचार

नाशिक : करोनाग्रस्त तसेच करोनाबाह्य़ अंतर्गत रुग्णांसाठी मदतीचा हात म्हणून ‘१०८ क्रमांक रुग्णवाहिका’ने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.  राज्यात करोनाकाळात सर्वसामान्य अशा पाच लाख नऊ हजार २०८ रुग्णांनी या रुग्णवाहिकेचा लाभ घेतला असून दोन लाखांहून अधिक करोनाग्रस्तांना रुग्णवाहिकेमुळे वेळेत उपचार मिळाले आहेत. नाशिक जिल्ह्य़ात नऊ हजारांहून अधिक करोनाग्रस्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

रुग्णांची वाढती संख्या, त्यांना वेळेत औषधोपचार, रुग्णसंख्येचा वाढता दर नियंत्रणात आणण्याचे आव्हान मार्चपासून आरोग्य विभागासमोर उभे ठाकले आहे. टाळेबंदीमुळे तसेच करोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आकडा पाहता खासगी रुग्णालयांनी दवाखाने बंद ठेवले असताना सरकारी रुग्णालये रुग्णांसाठी संजीवनी ठरले. याच काळात अपघात, जळणे, हृदयरोग, उंचावरून पडणे, प्रसूती अशा वेगवेगळ्या कारणांमुळे उपचारांसाठी रुग्णसंख्या वाढलेली असतांना करोनाचा फैलावही वाढला. या रुग्णांना वेळेत सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेण्याची जबाबदारी १०८ रुग्णवाहिकेने लीलया पेलली. राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलै या कालावधीत १०८ रुग्णवाहिकेने पाच लाख नऊ हजार २०८ रुग्णांना सेवा दिली. करोनाकाळात लागू असलेल्या टाळेबंदीत दोन लाख २० हजार ४०२ रुग्णांना करोना कक्षापर्यंत पोहोचवले आहे.

नाशिक जिल्ह्य़ात करोनाव्यतिरिक्त प्रसूती, वीज पडणे, आत्महत्येचा प्रयत्न, हृदयरोग, जळणे, जमिनीवर पडणे अशा वेगवेगळ्या कारणांनी २० हजार ६१४ रुग्णांना उपचाराची गरज पडली. करोनाग्रस्त तसेच करोना संशयित असलेल्या नऊ हजार १८१ रुग्णांनाही सेवा देण्याचे काम १०८ रुग्णवाहिकेने केले असल्याची माहिती रुग्णवाहिका समन्वयक डॉ. अश्विन राघमवार यांनी दिली.