कळवण तालुक्यातील अभोण ग्रामीण रुग्णालयातील प्रकार, संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी

लोकसत्ता वृत्तविभाग

कळवण : तालुक्यातील अभोणा ग्रामीण रुग्णालयातील कोविड  केअर केंद्रात उपचार घेत असलेले अभोण्यातील ज्येष्ठ नागरिक चिंतामण कामळस्कर (७० ) यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. कामळस्कर यांच्या मुलांनी  ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामविस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली. मृतदेहावर तत्काळ अंत्यसंस्कार करण्यासाठी विनंती केली, परंतु ते काम आमचे नाही तर आरोग्य विभागाचे असून आम्हाला तेवढेच काम आहे काय, अशा प्रकारचे उत्तर त्यांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून ऐकावयास मिळाले.

रात्री ९ पर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत उपलब्ध न झाल्याने अखेरीस कामळस्कर बंधूंनी स्वत: पीपीई संच परिधान करून वडिलांच्या मृतदेहावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुमारे १२ तास मृतदेह दवाखान्यात पडून राहिल्याने परिसरात दरुगधी सुटली तसेच करोना आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात भीती निर्माण झाली. यामुळे दिवसभर दवाखान्यातील वातावरण सैरभैर झाले होते, असे रुग्णांकडून सांगण्यात आले.

एका महिन्याच्या  कालावधीत अभोणा गावातील पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून ३० जणांना करोनाची लागण झाली आहे. गाव बंद करण्यापलीकडे कोणत्याही योग्य उपाययोजना सार्वजनिक स्तरावर ग्रामपंचायतीने केलेल्या नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाने करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च केला असल्याचे सांगण्यात येते. मग हा खर्च कसा केला, याचा लेखाजोखा ग्रामपंचायतीने जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

अभोणा ग्रामपंचायतीने तत्काळ विद्युतदाहिनी उपलब्ध करून द्यावी, कामात कसूर करणारे प्रशासकीय अधिकारी , कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी, योग्य प्रशासकाची नेमणूक तालुका प्रशासनाकडून करण्यात यावी, अशी मागणी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील खैरनार , के. के. कामळस्कर , मनोज कामळस्कर आदीनी के ली आहे.