शालेय साहित्य मागणाऱ्या मुलांना शेतकरी बापानेच विष पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे गावात ही घटना घडली आहे. पंढरीनाथ बोराडे असं आरोपीचं नाव त्याला दारुचं प्रचंड व्यसन आहे. पंढरीनाथ बोराडे याने शालेय साहित्य मागितल्याच्या रागात मुलगी निकिता आणि मुलगा ऋषिकेश या दोघांना किटकनाश पाजलं. सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निकिता आणि ऋषिकेश यांनी वडिलांकडे शालेय साहित्य विकत आणण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र यामुळे चिडलेल्या पंढरीनाथ बोराडे याने मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि नंतर दारुच्या नशेत दोन्ही मुलांना किटकनाशक पाजून मारण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी धाव घेतली. यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

सध्या दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु असून निकिताची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. निकिता खासगी तर मुलगा ऋषिकेश जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. दोन्ही मुलांचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पंढरीनाथ बोराडेला अटक केली आहे.