08 April 2020

News Flash

पाच दिवसांचा आठवडा अडचणीचा

कार्यालयीन वेळ पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा अशी झाल्यामुळे संबंधितांना पंचवटीची वेळ साधणे अवघड होणार आहे.

  • मुंबईला जा-ये करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसमोर पेच
  • कार्यालयीन वेळ पावणेदहा ते सव्वासहा, पंचवटी एक्स्प्रेसची वेळ साधणे गैरसोयीचे

नाशिक : पंचवटी एक्स्प्रेसने मुंबईत दररोज ये-जा करणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवडय़ाचा निर्णय नव्या अडचणी निर्माण करणारा ठरला आहे. शेकडो शासकीय कर्मचारी पंचवटी एक्स्प्रेसने मुंबईत ये-जा करतात. सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी निघणारी पंचवटी मुंबईत १०.४५ वाजता पोहचते. तर सायंकाळी सव्वा सहा वाजता ती छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावरून निघते. कार्यालयीन वेळ पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा अशी झाल्यामुळे संबंधितांना पंचवटीची वेळ साधणे अवघड होणार आहे.

केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कार्यालयांनाही कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याचा आनंद आहे. परंतु, स्थानिक पातळीवरून रेल्वेने दररोज मुंबई गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र तो अडचणीचा ठरणार आहे. नाशिक शहरासह मनमाड, निफाड, लासलगाव आणि आसपासच्या परिसरातून मुंबईला ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामध्ये विद्यार्थी, खासगी नोकरदारांसोबत शासकीय कर्मचाऱ्यांचेही प्रमाण अधिक आहे.

ग्रामीण भागात असेही काही कर्मचारी आहेत जे आसपासच्या गावातून दुचाकीवरून लासलगाव, मनमाड स्थानकावर येतात. नंतर पंचवटी पकडतात. सिडको, सातपूर, ओझर, आडगाव, आनंदवल्ली भागातील नोकरदारांना पंचवटीच्या प्रवासासाठी एक तास आधी घरातून निघावे लागते. मुंबईत पावणे अकरा वाजता पोहोचल्यानंतर आपले कार्यालय गाठावे लागते. आता शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी पावणेदहाची झाली आहे.

पंचवटीच्या सध्याच्या वेळेनुसार हे सर्व कर्मचारी दररोज म्हणजे आठवडय़ातील पाचही दिवस एक तास उशिराने आपल्या कार्यालयात पोहोचतील. प्रश्न केवळ एक तास उशिराने पोहोचण्याचा नाही तर सायंकाळी पुन्हा सव्वा सहा वाजता छत्रपती शिवाजी स्थानकावरून परतीच्या प्रवासासाठी पंचवटी पकडण्याचा देखील आहे. आजवर कार्यालयातून बाहेर पडून पंचवटी एक्स्प्रेस पकडणे बहुतेकांच्या सोयीचे होते.

आता मात्र कार्यालय सव्वा सहा वाजता सुटणार असल्याने उशिराने आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विहित वेळेआधी बाहेर पडण्याची मुभा कोण देईल? ही चिंता अनेकांना सतावत आहे. या घटनाक्रमाने शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची अडचण झाली असली तरी त्यांना तक्रार करता येणार नाही. यावर रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. मीर कासीम अली यांनी बोट ठेवले. शासकीय नोकरदारांना मुख्यालयी वास्तव्य करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पंचवटीने प्रवास करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची दुहेरी कोंडी होणार असल्याचे चित्र आहे.

‘पंचवटी’च्या वेळेत बदल करणे क्रमप्राप्त

शासकीय कार्यालयांच्या वेळापत्रकात झालेल्या बदलामुळे दैनंदिन ये-जा करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पंचवटी एक्स्प्रेसची वेळ साधणे गैरसोयीचे ठरणार आहे. मुळात ग्रामीण भागासह शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असणाऱ्या प्रवाशांना पंचवटी पकडण्यासाठी तासभर आधी घरातून बाहेर पडावे लागते. मुंबईत पोहोचल्यावर जलदगतीने आपले कार्यालय गाठावे लागते. सायंकाळी पंचवटी पकडण्यासाठी तशीच धावपळ करावी लागते. या सर्वाचा विचार केल्यास बदललेल्या कार्यालयीन वेळेनुसार पंचवटी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात त्यानुसार बदल करणे आवश्यक आहे. वेळेत बदल करतांना पंचवटी एक्स्प्रेस पावणे तीन तासाच्या आत प्रवास करेल असे नियोजन करता येईल. त्यासाठी कसारा, कल्याण येथील थांब्याची वेळ कमी करता येईल.

– डॉ. कैलास कमोद (माजी अध्यक्ष, ओबीसी आर्थिक विकास महामंडळ)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:06 am

Web Title: five days week work government employee akp 94
Next Stories
1 महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज ‘लोकसत्ता अर्थसल्ला’
2 देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण
3 अजित पवारांनी थोपटली नाशिकच्या इंजिनिअर तरूणीची पाठ; कारण…
Just Now!
X