अनिकेत साठे

सटाणा-साक्री रस्त्यावर १०० एकरवर धर्मराज फार्म आहे. या बागेतील द्राक्षे परदेशात जाणार होती. परतीच्या पावसाने आज ती बागेतच सडत आहेत. घडांना बुरशी लागली आहे. या भागातील शेकडो बागांमध्ये अशी स्थिती असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या पोरांनी फटाके वाजवले, मात्र आमच्या कुटुंबाला दिवाळी साजरी करता आली नाही, असे बागेचे मालक कृष्णा भामरे सांगत होते. बाळू हिरे यांची निफाड तालुक्यात तीन एकर जमीन आहे. दुचाकीवर पेंडय़ा घेऊन ते पत्नीसमवेत निघाले होते. कोणी तरी शेताची पाहणी करत असल्याचे पाहून थांबले. आमच्या पिकांचाही पंचनामा करा, अशी विनवणी करू लागले. कापून ठेवलेले त्यांचे सोयाबीन पाण्यात वाहून गेले. उर्वरित शेतात सडले.  नाशिक विभागातील पाचही जिल्ह्य़ांत पावसाच्या तडाख्याने लाखो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. विभागात २६ लाख ७२ हजार हेक्टरपैकी १६ लाख ३६ हजार २८३ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. ६३ टक्के शेती उद्ध्वस्त झाली. जळगावमध्ये सर्वाधिक तर नगर, नाशिक, धुळ्यातही कमी-अधिक फरकाने ही स्थिती आहे. नंदुरबारमध्ये तुलनेत कमी नुकसान आहे. शेतातील कापसाला तसेच मका, ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले. बियाणे, खते, फवारणी, मशागतीसाठी अतोनात खर्च करूनही कित्येकांच्या घरात कापसाचे एकही बोंड आले नाही. उडीद, मूग, कांदा अशी अनेक पिके शेतात सडली. काहींनी उघडीप मिळताच ज्वारी, सोयाबीनची घाईघाईत कापणी केली होती. मात्र, त्यांचे जमिनीवर पडलेले धान्य जागेवरच उगवले. भात पीक आडवे झाले. लष्करी अळीमुळे पेरणी केलेला मका खराब झाल्यावर मक्याची कणसे काळी पडून त्यांना कोंब फुटले. टोमॅटोने मान टाकली. कांदा पाण्याखाली गेला. भाजीपाल्याची वेगळी अवस्था नाही.

द्राक्षबागा जमीनदोस्त

बागलाण, मालेगाव, देवळा तालुक्यात द्राक्ष बागांची हंगामपूर्व (अर्ली) छाटणी केली जाते. नाताळात जगात द्राक्ष पुरविणारा एकमेव परिसर, अशी या भागाची ओळख. उत्पादकांनी निर्यातीसाठी व्यापाऱ्यांशी ७० ते १५० रुपये किलो दराने सौदे केले होते. तयार माल दिवाळीनंतर परदेशात जाण्यास सुरुवात होणार होती. तत्पूर्वीच होत्याचे नव्हते झाले.

मदतीपासून हजारो शेतकरी वंचित

दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. एकटय़ा नाशिक जिल्ह्य़ात सुमारे ३९ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची १४ कोटींहून अधिकची रक्कम मिळणे बाकी आहे. नाशिक विभागात शासनाकडे प्रलंबित थकीत रकमेचा आकडा ९० कोटींच्या घरात आहे. गारपिटीच्या नुकसानभरपाईची यादी जाहीर होऊन कित्येक महिने लोटले. पण तीदेखील मिळालेली नाही. या कारणावरून पाहणी दौऱ्यावर आलेल्या कृषी विभागाच्या सचिवांना शेतकऱ्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. २०१८ मध्ये मार्च, जून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तर २०१९ वर्षांत एप्रिल, जून, ऑगस्टमध्ये नैसर्गिक आपत्तीने पिकांचे नुकसान झाले होते. त्या मदतीपासून हजारो शेतकरी वंचित आहेत.

मजुरांवर बेरोजगारीचे सावट

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची झळ द्राक्ष बागांसह शेतात काम करणाऱ्या मजुरांनाही बसणार आहे. या संकटाने शेतीचे अर्थचक्र कोलमडले. द्राक्ष बागांमध्ये सुमारे पाच लाख मजूर विविध कामे करतात. एकरी तीन ते चार मजूर लागतात. नाशिक जिल्ह्य़ात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर बागा आहेत. इतर पिकांसाठी शेतात मजुरांची गरज भासते. आता शेतात फारसे काही राहिले नसल्याने मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.