आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, पक्षांतराचे वारे जोमात वाहत असताना त्याचा सर्वाधिक फटका महापालिकेतील सत्ताधारी मनसेला सहन करावा लागत आहे. मनसेच्या पाच जणांसह एकूण ७ नगरसेवकांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
इतर पक्षांतील नगरसेवक एकापाठोपाठ एक शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याने भाजपने या माध्यमातून मित्रपक्षाला शह देण्याचा प्रयत्न केला. शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेत आणखी काही जण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले गेल्यामुळे मनसेसह इतर राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
गुरुवारी मुंबई येथे भाजप कार्यालयात झालेल्या या सोहळ्यात मनसेच्या माधुरी जाधव, वंदना शेवाळे, अर्चना थोरात, दीपाली कुलकर्णी, सुनीता मोटकरी यांच्यासह माकपचे नगरसेवक सचिन भोर, शिवसेनेच्या नगरसेविका कोमल मेहेरोलिया यांनी प्रवेश केला.
पालिका निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत गेल्या महिनाभरात शिवसेनेने इतर पक्षातील सहा नगरसेवकांना आपल्याकडे खेचले. या स्पर्धेत आपण मागे राहू नये म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने हा प्रवेश सोहळा घडवून आणला. शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश महाजन, वसंत गीते यांच्या उपस्थितीत सात नगरसेवक, एक जिल्हा परिषद सदस्य, एका माजी नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी आ. प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पक्षासाठी अविरत मेहनत घेऊन संघटना वाढीस लावण्याचा मानस या वेळी नेत्यांनी व्यक्त केला.