गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात संततधार सुरू असून मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपले आहे. नाशिकमधील गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात काल (दि.१५) रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास गंगापूर धरणात ४० हजार २०० दशलक्ष घनफूट पर्यंत पाणीसाठा वाढला आहे. गंगापूर धरण ७५ टक्के भरल्याने आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. २००० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदी पात्रातील पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे. हे पाणी काही वेळातच सोमेश्वर धबधब्यापर्यंत पोहचेल असा अंदाज सूत्रांकडून वर्तविला जात आहे.

जिल्ह्यातील दारणा आणि नांदूरमध्यमेश्वर धरणांतूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी आणि दारणा नदीच्या पात्रातील पातळी वाढल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रातील विसर्ग वाढू शकतो अशी माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांकडून प्राप्त होत आहे. सलग तीन दिवस जिल्ह्यातील संततधारेमुळे गोदावरी नदीच्या पात्रातील पातळी प्रचंड वाढल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नाशिककरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदीकाठावरील रहिवाशांना सावधान करण्यात आले असून पंचवटीतील रामकुंड परिसरातील विक्रेत्यांनाही हलविण्यात आले आहे. नदीवरील सोमेश्वर येथील धबधबा, नवश्या गणपती, रामकुंड तसेच नदीच्या किनाऱ्याजवळ तसेच जिल्ह्यातील इतर नदी, नाल्यांवर नागरिकांनी जाणे टाळावे तसेच सेल्फी काढणे टाळावे अशा विविध सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

घोटी-सिन्नर महामार्गावरील वाहतूक बंद

घोटी-सिन्नर महामार्गावरील पुलाला अनेक ठिकाणी मोठी भगदाडे पडल्याने पुलाच्या दुरूस्तीसाठी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलाच्या दुरूस्तीकरिता येथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा विनंती करूनही प्रशासनाने याप्रश्नी दुर्लक्ष केल्याने ऐन पावसाळ्यात आता प्रशासनाला जाग आली असून पुलाच्या दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांसह मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया येत आहेत.