नाशिकचे पर्यटनदृष्टय़ा महत्त्व वाढविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने गोदा काठावर वाराणसीच्या धर्तीवर ‘गोदा आरती’ उपक्रम सुरू करण्यात आला होता. परंतु, ज्या जोमात गोदा आरती सुरू झाली तो जोम कमी झाला असून केवळ आरतीची औपचारिकता पार पाडली जात आहे. गोदा आरतीचे अस्तित्व बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या नजरेत ठळकपणे भरावे यासाठी पर्यटन महामंडळाने आता अनोखी शक्कल लढविली असून नवीन मंत्रिमंडळ सत्तेवर आल्यावर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

नाशिक येथे होणारे धार्मिक पर्यटन पाहता ही ओळख सर्वदूर पोहचावी पर्यटनाच्या क्षेत्रात नाशिकचा दबदबा निर्माण व्हावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वेगवेगळे उपक्रम राबवीत असले तरी उपक्रमाच्या आरंभशूरतेनंतर आलेली मरगळ सर्वश्रृत आहे. बोटिंग क्लब, कलाग्राम हे उपक्रम महामंडळाची उपक्रमशूरता आणि अनास्था ठळकपणे अधोरेखित करतात.

महामंडळाने विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच ‘गोदा आरती’चा घाट घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गोदाआरतीचे नियोजन होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम मोदींऐवजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी गोदाआरतीमध्ये खंड पडणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असे आश्वासन महाजन यांनी दिले होते. यानंतर गोदाआरती नियमितपणे सुरू असली तरी कधी पुरोहित संघाच्या मानधनाचा मुद्दा, कधी आरतीसाठी साहित्याचा अभाव, अशा वेगवेगळ्या मुद्दय़ांवरून गोदा आरती चर्चेत राहिली आहे. उपक्रमात खंड नसला तरी उपक्रमाच्या वेळी असणारा जोश, उत्साह सर्वाचा मावळला आहे. या पाश्र्वभूमीवर गोदा आरती उपक्रमात चैतन्य निर्माण व्हावे यासाठी महामंडळ प्रयत्न करत आहे.

याविषयी महामंडळाचे गोदाआरती प्रकल्प समन्वयक महेश बागूल यांनी गोदा आरती नियमित सुरू असून ती भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचावी यासाठी महामंडळ प्रयत्न करत असल्याचे सांगितले. गोदाकाठावर दशक्रिया विधीसह अन्य धार्मिक विधी होत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक, पर्यटक या ठिकाणी येतात. त्यांना गोदाआरती उपक्रमाची माहिती व्हावी यासाठी लवकरच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, लोकप्रतिनिधी यांच्यासह वेगवेगळ्या मंत्र्यांच्या उपस्थितीत गोदाआरती होईल. या उपक्रमांची प्रसिद्धी होईल. यामुळे निधीचाही प्रश्न पुढील काळात सुटेल, असा विश्वास बागूल यांनी व्यक्त केला.