08 July 2020

News Flash

होळकर पुलापासून तपोवनापर्यंत गोदापात्र स्वच्छतेची गरज

विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांनी असाच प्रयोग आता राबविण्याची गरज आहे.

  नाशिक येथे महापालिकेतर्फे गोदापात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अहिल्यादेवी होळकर पुलाखाली अजून बऱ्याच प्रमाणात गाळ असून सद्य:स्थितीत रामवाडी पुलाजवळ गाळ काढला जात आहे. 

सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी गोदापात्र स्वच्छतेसाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या महापालिका प्रशासनासह स्वयंसेवी संस्था त्यानंतर गायब झाल्यासारखी स्थिती असून गोदापात्र कचरा व घाणीचे जणू काही गोदाम झाले आहे. दुष्काळ आणि टंचाईमुळे अहिल्यादेवी होळकर पूल ते तपोवनापर्यंत बहुतांश ठिकाणी गोदापात्र कोरडे झाले आहे. गोदापात्र स्वच्छतेसाठी ही संधी समजून स्वच्छता मोहीम आखणे गरजेचे असताना सर्वानी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याची भाविकांची भावना झाली आहे.

कुंभमेळ्यातील तीन पर्वण्या पार पडेपर्यंत रामकुंडापासून तपोवनापर्यंत गोदापात्र स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत होती. शेकडो स्वच्छता कर्मचारी दिवस-रात्र नदीपात्रात झाडू घेऊन फिरताना दिसत होते. विविध स्वंयसेवी संस्थांच्या कर्मचाऱ्यांची त्यांना साथ मिळत होती. कचरा दिसताच तो उचलला जात होता. त्यामुळे नदीपात्र चकाचक झाले होते. नदीपात्राचे बदललेले स्वरूप नाशिककरांनाही विशेष वाटत होते. पर्वणीप्रसंगी त्यामुळेच नदीकाठी फिरण्यासाठी येणाऱ्या नाशिककर नागरिकांच्या संख्येतही वाढ झाली होती. गोदापात्राची ही सुंदरता अशीच कायम राहील असे वाटत असताना कुंभमेळा संपला आणि सुंदरताही लोप पावली. तिसरी पर्वणी यशस्वीरीत्या पार पडताच पालिका व जिल्हा प्रशासनाने जणू काही आपली जबाबदारी संपली, असे मानत नदीपात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. रामकुंड परिसरात इतर राज्यातील भाविक येत असल्याने थोडीफार स्वच्छता केली जाते. परंतु, रामसेतू पुलापासून थेट तपोवनापर्यंत गोदापात्राची अवस्था फिरणेही नको अशी झाली आहे. प्रचंड प्रमाणावर घाण आणि अस्वच्छतेचे आगार या ठिकाणी तयार झाले आहे. या परिसरात नदीकाठालगत फिरतानाही दरुगधीमुळे असह्य़ होते. पाणी वाहणे पूर्णपणे बंद झाल्याने नदीपात्रात काही ठिकाणी साचलेल्या पाण्याची डबकी तयार झाली आहेत. या डबक्यांचे स्वरूप गटारीप्रमाणे झाले आहे. गोदापात्राच्या या स्वरूपामुळे परिसरात रोगराई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पात्रात पाणी नसल्याची संधी साधत पालिका प्रशासनाने रामकुंड परिसराप्रमाणेच रामसेतूपुढेही नदीपात्रातील घाण काढण्याची गरज आहे. स्वयंसेवी संस्थांनीही अशा स्वरूपाची स्वच्छता मोहीम सध्या राबविण्याची गरज आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला असल्यामुळे नदीला पूर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी नदीपात्र स्वच्छ होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास पावसाळ्यात घाणीची अधिक दरुगधी पसरण्याची शक्यता आहे. याआधी कुंभमेळाच्या पाश्र्वभूमीवर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन एक संपूर्ण दिवस गोदावरी स्वच्छतेला दिला होता. त्या एका दिवसात मोठय़ा प्रमाणावर घाण बाहेर काढण्यात आली होती.

विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांनी असाच प्रयोग आता राबविण्याची गरज आहे. कुंभमेळा सुरू असताना राजकीय पक्ष तसेच स्वंयसेवी संस्थांमध्ये रामकुंड परिसरात गोदापात्र स्वच्छतेसाठी जणूकाही स्पर्धा लागली होती. विशेष म्हणजे रामकुंड परिसराव्यतिरिक्त इतरत्र नदीपात्र स्वच्छतेसाठी ही मंडळी जात नव्हती. या सर्व मंडळींनी पुन्हा एकदा गोदापात्र स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. रामकुंड परिसरात भाविकांचे येणे अधिक असल्याने फक्त त्याच ठिकाणी स्वच्छता करून भागणार नाही. तपोवनालाही तितकेच धार्मिक महत्त्व असल्याने आणि रामकुंडापासून तपोवनापर्यंत दोन्ही बाजूस वस्ती असल्याने तपोवनापर्यंत गोदापात्रातील घाण दूर करणे आवश्यक झाले आहे. पावसाळ्यात पूर आल्यावर नदीतील सर्व घाण आपोआप वाहून जाईल, या भरवशावर प्रशासनाने न राहता स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 2:37 am

Web Title: godavari river cleanness project in nashik
टॅग Nashik
Next Stories
1 जूनमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांची द्वारसभा
2 घरकुलांसाठी ५० हजारात जागा कशी मिळणार ?
3 कपालेश्वर मंदिर प्रवेश नाटय़ात धक्काबुक्की, गोंधळ
Just Now!
X