लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : खेडभैरव देवाची वाडी शिवारात दुकानातून आजीसमवेत पायवाटेने घरी जाणाऱ्या बालिकेवर बिबटय़ाने मंगळवारी हल्ला केला. नातीला वाचविण्यसाठी आजीने बिबटय़ाचा जोरदार प्रतिकार के ला. त्यामुळे बिबटय़ाला धूम ठोकावी लागली. बिबटय़ाच्या हल्लय़ात जखमी झालेल्या बालिकेला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खेडभैरव येथील देवाची वाडी शिवारातील पुंडलिक डगळे यांची सहा वर्षांची मुलगी किरण ही नेहमीप्रमाणे मंदिर परिसरातील दुकानातून पायवाटेने घरी जात होती. समवेत तिची आजी आणि बहीण होती. ते जात असतांना बिबटय़ाने अचानक झडप घालून किरणवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने प्रारंभी आजी घाबरली. मदतीसाठी त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर हिमतीने बिबटय़ाशीप्रतिकार केला. बिबटय़ाच्या तावडीतून नातीला सोडवले. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी तत्काळ वनविभागास माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. बुधवारी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते. तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपाल ढोन्नर, रेश्मा पाठक, पाडवी, सय्यद, मुनिफ शेख आदींनी परिसरात गस्त घालून बिबटय़ाचा मागोवा घेतला. बिबटय़ास जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. वनविभागाचे फिरते पथक प्रमुखांनी घटनास्थळी येऊन बिबटय़ास जेरबंद करण्यासाठी सूचना दिल्या.