नाशिक रोझ सोसायटी, पुणे रोझ सोसायटी, डॉ. म्हसकर गुलाबप्रेमी गट यांच्यातर्फे  आयोजन

नाशिक : कधीकाळी गुलशनाबाद म्हणून ओळखल्या जाणारा नाशिकचा गुलाब प्रसिद्ध होता. काळाच्या ओघात ही ओळख मागे पडली. नाशिकचे हवामान गुलाबासाठी अतिशय पोषक असून गुलाबाची बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना गुलाब शेतीकडे वळविण्याचा संकल्प नाशिक रोझ सोसायटीने केला आहे. जनजागृती, मार्गदर्शन आणि संघटन यामुळे शहरात गुलाबाच्या झाडांची लागवड करून जोपासना करणाऱ्यांची संख्या वृद्धिंगत होत असल्याचे आशादायक चित्र गुलाब पुष्प स्पर्धेतून पुढे आले आहे.

नाशिक रोझ सोसायटी, पुणे रोझ सोसायटी आणि डॉ. म्हसकर गुलाबप्रेमी गट यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाइन गुलाब पुष्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुलाब जगतात अशा प्रकारे ऑनलाइन स्पर्धा प्रथमच घेण्यात आली.  स्पर्धेची नियमावली गुलाबतज्ज्ञ डॉ. विकास म्हसकर यांनी तयार केली. स्पर्धेला नाशिकसह संपूर्ण देशातील गुलाबप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन गटांत ही स्पर्धा झाली. नाशिकच्या गुलाबप्रेमींसाठी एक आणि दुसरा खुला गट होता. एकूण ८७८ प्रवेशिका प्राप्त झाल्या. स्पर्धेत मुख्यत्वे तीन प्रकारच्या गुलाब पुष्पांचा समावेश होता. विविध रंगांच्या गटांत ही स्पर्धा पार पडली. स्पर्धकांना त्यांच्या गुलाब पुष्पाच्या झाडावरील आणि पारदर्शक बाटलीतील छायाचित्र तसेच सर्व बाजूंनी केलेले चित्रीकरण सादर करणे अपेक्षित होते.

झाडावरील फुलाच्या छायाचित्रामुळे परीक्षकांना फुलाबरोबरच झाडाचे आरोग्य लक्षात येते. छायाचित्रणामुळे परीक्षकांना ते फूल सर्व बाजूंनी न्याहाळता आले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. विकास म्हसकर, रवींद्र भिडे आणि भगवंत ठिपसे या नामांकित गुलाबतज्ज्ञांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्याकरिता नाशिक रोझ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. धनंजय गुजराथी, सचिव अमिता पटवर्धन, उपाध्यक्ष डॉ. विलास बोंडे, प्रफुल्ल बोरसे, प्रेरणा कुलकर्णी यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.

या उपक्रमास रामेश्वर सारडा यांचेही सहकार्य मिळाले. नाशिक रोझ सोसायटीची स्थापना होऊन वर्षभराचा कालावधी झाला आहे. गुलाबप्रेमींचे संघटन करून संस्था गुलाबाच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे. यामुळे शहरात गुलाबांची लागवड करून जोपासना करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. स्पर्धेत नाशिक गटात जवळपास ७५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यांच्या दीडशेहून अधिक प्रवेशिका होत्या. अगदी १५ वर्षापासून ते ८० पर्यंतचे स्पर्धक होते. पुढील काळात ग्रामीण भागात गुलाब शेतीला प्रोत्साहन देण्याचा सोसायटीचा प्रयत्न आहे.

स्पर्धेतील मानकरी स्पर्धेत नाशिक गटात गुलाब राजा – मंगेश अमृतकर, गुलाब राणी – उमाकांत पवार, गुलाब राजपुत्र – धनश्री कुलकर्णी, गुलाब राजकन्या – सुषमा गुजराथी यांच्या गुलाब फुलांनी तर खुल्या गटात गुलाब राजा – हितेश शहा (जबलपूर), गुलाब राणी – अरुण वाराणशीवार (पुणे), गुलाब राजपुत्र – अहमद आलम खान (हैदराबाद) आणि गुलाब राजकन्येचा किताब हसन मन्सुरा (नागपूर) यांच्या गुलाब पुष्पांनी मिळवला.

गुलाब शेतीला प्रोत्साहन मिळावे, हा नाशिक रोझ सोसायटीचा मुख्य उद्देश आहे. सोसायटीची स्थापना झाल्यानंतर वर्षभरात शहरात १५० ते २०० जण गुलाब लागवड अर्थात संस्थेशी जोडले गेले. या काळात जागतिक गुणवत्तेचे गुलाब फुलविणारे २५ उत्पादक आम्ही तयार करू शकलो. गुलाबाची प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. स्थानिक हवामान गुलाबासाठी चांगले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुलाब शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. – डॉ. धनंजय गुजराथी (अध्यक्ष, नाशिक रोझ सोसायटी)