खासगी पेढय़ा बंद करण्यासाठी आंदोलन
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी विशेषत: महिला वर्गाकडून सोन्याच्या दागिन्यांची खरेदी होते. यंदा प्रथमच संपामुळे सणासुदीच्या दिवशी सुवर्णकारांची दुकाने बंद राहिली. या पाश्र्वभूमीवर, काही खासगी व्यावसायिकांनी ही संधी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सुवर्णकारांनी आंदोलन करत संबंधितांना दुकाने बंद करणे भाग पाडले. दुसरीकडे, वाहने व गृह खरेदीत तेजी पहावयास मिळाली.
महिला वर्गात दागिन्यांची असणारी आवड सर्वश्रुत आहे; परंतु सुवर्णकारांच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या संपामुळे अनेकांना गुढीपाडव्याचा मुहूर्तावर सोने खरेदीला मुरड घालावी लागली. ३४ दिवसांपेक्षा अधिक काळ चाललेला संप गुढीपाडव्याच्या दिवशी स्थगित होईल किंवा व्यावसायिक तात्पुरता मार्ग काढतील, अशी ग्राहकांची अपेक्षा होती. मात्र व्यावसायिक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अनेकांचा हिरमोड झाला. सुवर्णकारांची दुकाने या दिवशी बंद राहिली. एरवी, गुढी पाडव्याच्या दिवशी ग्राहकांच्या मांदियाळीने हा परिसर फुललेला असतो. कोटय़वधींची उलाढाल या दिवशी होते; परंतु संपामुळे या दिवशी मात्र विपरीत चित्र पाहावयास मिळाले. दुकाने बंद असल्याने ग्राहकही या बाजारपेठेत आले नाही. जे आले त्यांना माघारी फिरावे लागले.
सुवर्णकारांची दुकाने बंद असल्याची संधी साधण्याचा प्रयत्न काही व्यावसायिकांकडून झाला. शहरातील खासगी कंपन्यांसह कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड परिसरातील काही सराफी दुकाने सकाळपासून सुरू होती. गुढी पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकही या ठिकाणी गर्दी करू लागले. ही माहिती समजल्यानंतर सराफ व्यावसायिकांनी ही दुकाने बंद करण्यासाठी दुचाकींवरून धाव घेतली. संबंधितांच्या कार्यशैली विरुद्ध जोरदार घोषणा देत दुकाने बंद करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर पोलीस दाखल झाले. या घडामोडींमुळे संबंधितांनी दुकाने बंद केल्यावर आंदोलन करणारे सराफ व्यावसायिक निघून गेले. संबंधितांची दुकाने बंद करण्यासाठी सुवर्णकारांनी कोणतीही दंडेलशाही केली नसल्याचा दावा नाशिक सराफ व्यावसायिक संघटनेचे राजेंद्र दिंडोरकर यांनी केला. उपरोक्त दुकाने सुरू असल्याचे समजल्यावर सुवर्णकारांनी गांधीगिरी पद्धतीने गुलाबाची फुले देत दुकान बंद करण्याची विनंती केली. आमची ही विनंती मान्य करत संबंधितांनी दुकाने बंद केली असे दिंडोरकर यांनी सांगितले. संपामुळे सोने खरेदीचा मुहूर्त साधता आला नसला तरी वाहन, घरकुलसह अन्य नवीन वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांनी चांगलाच मोर्चा वळविला होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतींचा वर्षांवही करण्यात आला. या क्षेत्रात एकाच दिवसात कोटय़वधींची उलाढाल झाली.