वाहतूकदार संघटनेचा आंदोलन करण्याचा इशारा

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावर फास्टॅगमध्ये तांत्रिक अडचणी असून टोल कर्मचारी परवाना, मालाची कागदपत्रे, वाहतूक परवाना घेऊन चालकांना दमबाजी करत आहेत. नाक्यावर वाहनधारकांवरही दादागिरी केली जात आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून या असुविधा दूर न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नाशिक वाहतूकदार संघटनेने दिला आहे.

याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड आणि नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम. सैनी यांच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े, टोल व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले. िशदे टोल नाक्यावरील अडचणींबाबत संघटनेने याआधी निवेदन दिले आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी चालकांना मारहाण केल्याचे प्रकारदेखील घडल्याकडे संघटनांनी लक्ष वेधले आहे.

नाशिक-पुणे रस्त्यावरील शिंदे टोल प्लाझा येथे स्वछतागृहांची गैरसोय आहे. चालकांना थांबण्यासाठी कु ठलीही व्यवस्था नाही. टोल नाक्याजवळील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था आहे. रुग्णवाहिकेची देखील या ठिकाणी सोय नाही. नाशिक ते सिन्नरदरम्यान मोह गावाजवळ रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वारंवार अपघात होतात. शासनाने ठरवून दिलेली नियमावली पायदळी तुडविण्याचे काम या टोल प्रशासनाकडून होत आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा केलेली विद्युत दिव्यांची व्यवस्था पूर्णपणे बंद असून अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे.

विविध प्रश्नांबाबत टोल प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर दादागिरीची भाषा के ली जाते. यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिंदे टोल नाक्यावरील व्यवस्थापनाला आदेश देऊन उपरोक्त प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा वाहतूकदार संघटनांना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचे फड आणि सैनी यांनी म्हटले आहे. जिल्ह्य़ात टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून होणारी अरेरावी हा चिंतेचा विषय ठरत आहे. पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारच्या सर्वाधिक तक्रोरी आहेत. या अरेरावीचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसला आहे.