हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाच्या त्रासांत लक्षणीय वाढ; तर कोणाला लग्नाची चिंता

जिल्हा प्रशासनाने बळाचा वापर करत समृद्धी महामार्गासाठी मोजणी रेटण्याचा स्वीकारलेला पवित्रा शेतकऱ्यांमध्ये विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरला आहे. प्रस्तावित मार्गात बागायती शेती जाणार, या धास्तीने एका शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. कोणाला उच्च रक्तदाब तर कोणाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-अधिक होण्याचा त्रास सुरू झाला. शेतजमिनीसह डोक्यावरील छप्परही जाणार असल्याने मुलाला कोणी मुलगी देत नसल्याने कुटुंबीय चिंताक्रांत तर सुटीवर आलेल्या लष्करी जवानास आईला एकटे सोडून जम्मू-काश्मीरमध्ये जावे की नाही, असा प्रश्न पडला आहे. समृद्धी मार्गाच्या मोजणीमुळे सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांतील अस्वस्थतेचे वेगवेगळे पदर समोर येत आहेत.

प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा ९७ किलोमीटरचा   भाग जिल्ह्य़ातून जाणार आहे. त्यासाठी सिन्नरमधील २६ तर इगतपुरीतील २२ अशा एकूण ४८ गावांमधील जमीन संपादित करण्यात येणार आहे. या दोन्ही तालुक्यांत यापूर्वी वेगवेगळ्या कारणांस्तव मोठय़ा प्रमाणात भू-संपादन झाले. त्यामुळे एक इंचही जागा द्यायची नसल्याचे सांगत मोजणीला सर्व गावांमधून विरोध होत आहे. जिल्हा प्रशासन पोलीस बंदोबस्तात हे काम पुढे नेत आहे. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विपरीत परिणाम शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांवर झाल्याचे लक्षात येते. धोरवट-शिवडे शीव रस्त्याजवळ ज्ञानेश्वर चव्हाणके यांची बागायती जमीन आहे. आंबा, पेरू, नारळाच्या बागेसह ते टोमॅटोचेही पीक घेतात. मोजणीवेळी झालेल्या धक्काबुक्कीत त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. पाच जणांच्या कुटुंबाला चरितार्थासाठी दुसरा कोणताही आधार नसल्याचे उपचार घेणारे चव्हाणके सांगतात. शिवडे गावालगत आदिवासी पाडे आहेत. तेथील दोन ते अडीच हजार आदिवासी बांधवांना या बागायती क्षेत्रात रोजगार मिळतो. शेती गेल्यास शेतकऱ्यांसोबत आदिवासींना रोजीरोटीचे साधन गमवावे लागणार असल्याकडे ते लक्ष वेधतात. अपघातात जखमी झालेले ६५ वर्षांचे पंडित वाघ उपचार घेऊन अलीकडेच सावरले होते. परंतु, जमीन जाणार असल्याने तणावाखाली आलेल्या वडिलांनी घरात बोलणेही बंद केल्याचे त्यांचा मुलगा सोमनाथ वाघ यांनी सांगितले. शिवडे गावचे वाल्मीक हरक हे मराठा लाइट इन्फन्ट्रीमधील जवान. त्यांचा भाऊ तोफखाना दलात आहे. महिनाभराच्या सुट्टीवर आले असताना त्यांना महामार्गात जमीन जाणार असल्याचे समजले. गावाकडे केवळ आई असल्याने कामावर हजर व्हावे की नाही, या द्विधा मन:स्थितीत ते आहेत. आमची पाच एकर शेती आहे. कोणी करायला नसल्याने गवत व चिकूची बाग यावर आई देखरेख ठेवते. या घटनाक्रमाने कारगिलमध्ये तैनात भाऊही अस्वस्थ असल्याचे वाल्मीक यांनी सांगितले. हरिभाऊ शेळके  कांदा, गहू व भाजीपाला ही आंतरपिके घेऊन ते गुजराण करतात. पुढील वर्षांपासून नारळाचे उत्पन्न सुरू होणार असताना समृद्धी मार्गासाठी मोजणी सुरू झाली. शेतजमीन गेल्यास जगायला साधन राहणार नसल्याचे त्यांचे म्हणणे. याच भागात विलास हरक यांची पाच एकर द्राक्ष बाग व विहीर आहे. त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. जमीन गेल्यास इतक्या मोठय़ा कुटुंबाने कसे जगायचे, याची चिंता त्यांना सतावत आहे.

विरोधामुळे ‘समृध्दी’ची मोजणी थांबली

समृध्दी मार्गाच्या मोजणीला सलग दुसऱ्या दिवशी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम विरोध दर्शविल्याने जिल्हा प्रशासनाच्या पथकाला माघारी फिरावे लागले.  मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी पेटते टायर फेकले.  सौम्य लाठीमार झाल्यामुळे संतप्त जमावाने दगडफेक केली. यावेळी ४२ शेतकऱ्यांना ओझर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पहाटे तीन वाजेपर्यंत उपाशी ठेवल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. सिन्नरचे आ. राजाभाऊ वाजे यांनी पहाटे धाव घेतल्यानंतर सुटका झाल्याचे त्यांनी सांगितले. या पाश्र्वभूमीवर, शनिवारी शिवडे गावात कमालीचा तणाव होता. सकाळी मोठा फौजफाटा घेऊन प्रांताधिकारी महेश पाटील व इतर अधिकारी शिवडे गावात दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी बळाचा वापर करून मोजणीचा प्रयत्न झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी विषारी औषध सेवन करून तर काहींनी अंगावर घासलेट ओतून घेत आत्महत्या करण्याचा इशारा दिला.

लग्नासाठी मुलगी मिळणेही अवघड

दोन्ही तालुक्यांत प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे समृद्धी मार्गात जमीन गेल्यास अनेकांना कायमचे भूमिहीन व्हावे लागणार आहे. सोनांब्याचे शहाजी पवार हे त्यांपैकीच एक. त्यांची ५६ गुंठय़ांपैकी ३६ गुंठे जमीन प्रस्तावित मार्गात जात आहे. सहा किलोमीटर अंतराची वाहिनी टाकून त्यांनी शेतात पाणी आणले. कर्ज घेऊन बंगल्याचे स्वप्न साकार केले. तुटपुंज्या पगारावर ते खासगी क्षेत्रात नोकरी करतात. मुलाच्या लग्नासाठी ते मुलगी शोधत आहेत. पण समृद्धीत सर्व जाणार असल्याने कोणी मुलगीही देण्यास तयार नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. कष्टाने उभे केलेले शेत आणि घर जाणार या धास्तीने रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याचे पवार यांनी सांगितले.