‘निसर्ग’ चक्रीवादळाचा जिल्ह्य़ाला तडाखा, विजेअभावी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत

नाशिक : अलिबाग, रत्नागिरी आदी भागास तडाखा देणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे परिणाम नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उमटले. सकाळपासून रिमझिम सरी अनुभवणाऱ्या शहरात सायंकाळी काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. सप्तश्रृंगी गडावर घाटात दरड कोसळली. वाहतूक बंद असल्याने जिवीतहानी टळली. किनारपट्टी भागातील वादळाच्या तीव्रतेने अनेकांच्या मनात आधीच धडकी भरली होती. अनेक भागातून मार्गक्रमण करत जेव्हा ते येथे दाखल झाले, तेव्हा त्याची तीव्रता काही भागात काहीअंशी कमी झाल्याचे जाणवले. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने वीज पुरवठा खंडित ठेवल्यामुळे शहरातील सायंकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. गुरूवारी सकाळी शहरात पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

बुधवारी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सटाणा, नाशिकसह आसपासच्या भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सकाळपासून अनेक भागात ढगाळ वातावरण होते. अधुनमधून रिमझिम पाऊस सुरू होता. वातावरणात कमालीचा गारवा पसरला. कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्याने नाशिकमध्ये त्याचे कसे आगमन होणार, याकडे सर्वाचे लक्ष होते. सायंकाळी वाऱ्याचा वेग वाढला. घाटमाथ्यावरील इगतपुरीत सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. एरवी वादळी पाऊस नाशिकसाठी नवीन नाही. त्यापेक्षा हे वादळ अधिक घोंघावणारे असणार, असे वाटत होते. परंतु, सायंकाळपर्यंत वाऱ्याचा वेग नेहमीसारखा राहिला. त्र्यंबकेश्वरमध्ये अधूनमधून एखादी सर बरसत होती. सटाण्यात दुपारी पावसाने हजेरी लावून कांदा, बाजरीचे नुकसान केले. सायंकाळी वादळ नाशिकमध्ये धडकणार असल्याचा अंदाज होता. परंतु, ते शहापूर परिसरात रेंगाळल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहर परिसरात वादळ धडकण्याआधीच पावसाला सुरूवात झाली. वादळाच्या संभाव्य मार्गात काहीअंशी बदल झाले. देवळाली कॅम्प, भगूर, निफाडमार्गे वादळ पुढे सरकण्याची चिन्हे दिसू लागली.

टाळेबंदीमुळे दुकाने सायंकाळी पाचपर्यंत उघडी असतात. वादळाच्या धास्तीने व्यावसायिकांसह ग्राहकांनी लवकर घरी निघून जाणे पसंत केले.  वादळाच्या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सज्जता राखली. जिल्हा आणि महापालिका प्रशासन सकाळापासून सतर्क झाले. जिवित, वित्त हानी टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामीण भागात दवंडी देण्यात आली. वादळी वाऱ्याचा कसा आणि कुठे फटका बसू शकतो, याचा अंदाज बांधून तयारी झाली. त्या अंतर्गत धोकादायक वाडय़ाचा भाग उतरविण्यात आला.

वैद्यकीय सेवा सुरळीत राखण्यासाठी आरोग्य विभागातील कोणालाही भ्रमणध्वनी बंद करण्यास वा मुख्यालय सोडण्यास प्रतिबंध करण्यात आला. दुसरीकडे गरज भासल्यास पडकी घरे, इमारती आणि नदी काठावर वास्तव्य करणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी करण्यात आली.

सटाण्यात कांदा, बाजरीचे नुकसान

सटाणा शहरासह तालुक्यात सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सर्वत्र डबके साचले. कांदा आणि उन्हाळ बाजरी भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी सायंकाळीही शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पाऊस कोसळला. बुधवारी पावसाला सुरुवात झाली. तासभर त्याने हजेरी लावली. रिपरिप सुरु होती. दुपारी जोर वाढल्याने ठिकठिकाणी डबके साचले होते. पाठक मैदानावर तळे निर्माण झाले. शहरासह ग्रामीण भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र चांगलाच दिलासा मिळाला.

शहरात सकाळी पाणी पुरवठा बंद

निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर, अनेक भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. महावितरण कंपनीने गंगापूर आणि मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशनवरील वीज पुरवठा बंद केला. यामुळे शहरातील सायंकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. गुरूवारी सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर गुरूवारी सायंकाळचा पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जाणार आहे्.