नाशिक : सोमवारी दुपारी पुन्हा एकदा शहरासह जिल्ह्य़ातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिक, मनमाडसह अनेक शहरांतील सखल भागात पाणी साचले. काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला. जिल्ह्य़ात २४ तासांत १९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे काही ठिकाणी उभी पिके  आडवी झाली असून खळ्यातील तसेच इतर ठिकाणी ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.

नाशिक शहरासह, मनमाड आदी भागांत सोमवारी दुपारी पूर्वा नक्षत्राच्या पावसाने चांगलेच झोडपले. कमी वेळेत मुसळधार पाऊस झाल्यामुळे सखल भागात पाणी साचले. काही रस्त्यांवर पाणी आल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नांदगावमध्ये ५५ मिलिमीटर, सुरगाणा ५२, येवला २३ मिलिमीटर पाऊस झाला. नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, निफाड, सिन्नर, चांदवड या भागांत तुरळक स्वरूपात पाऊस झाला. काही भागांत पाऊस कोसळत असताना पावसाचे तालुके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ, त्र्यंबकेश्वर भागात त्याचा लवलेशही नव्हता. बागलाण, देवळा तालुक्यांत वेगळी स्थिती नव्हती. जिल्ह्य़ात यंदाच्या हंगामात आतापर्यंत १३ हजार ६४३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मनमाड शहरात दुपारी पावसाने हजेरी लावली. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह सुमारे तासभर पाऊस झाला.

कांदा भिजला

पावसामुळे खळ्यांमध्ये तसेच इतर ठिकाणी ठेवलेला कांदा भिजला. जनावरांसाठी चारा आणि विहिरीतील पाणीवाढ होण्यासाठी हा पाऊस उपयुक्त असला तरी गेल्या महिन्यांत सलग १५ दिवस चाललेल्या संततधारेने अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. भाजीपाला पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.