वाहतूक पोलीस शाखेतर्फे पत्र स्पर्धा

‘प्रिय आई, बाबा.’ असे पत्र अवचित हातात आले तर आपला वाढदिवस किंवा ‘मदर्स डे, फादर्स डे’चे औचित्य आहे म्हणून आपण पालक म्हणून पार पाडलेल्या जबाबदारीची गोडगुलाबी शब्दात पावती मुलांनी त्यांच्या शब्दात दिली या भ्रमात राहू नका. या पत्रास कारण आहे, तुम्ही पालक म्हणून भविष्यात किती गरजेचे आहात हे त्यांच्याच शब्दात पटवून देण्याचे. शहर वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत ‘हेल्मेट सक्ती’विषयी सुरू केलेल्या जनजागृतीचे. शहर परिसरातील शाळांच्या सहकार्याने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमात शालेय विद्यार्थी त्यांच्या पालकांना पत्र लिहित आहेत.

प्रत्येक माणसासाठी त्याचे कुटूंबिय महत्वाचे असले तरी त्यांची मुले ही त्यांच्या मनातील हळवा कोपरा असतो. आयुष्यातल्या साऱ्या खटापटी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी होत असतात. मुलांनी सांगायचे आणि पालक म्हणून आई-बाबांनी ऐकायचे असा भावनिक बंध. शहर पोलिसांनी या नाजूक बंधाचा वापर पालकांच्या जनजागृतीसाठी करण्याचे ठरवले आहे. आपले पाल्य जीवनात यशस्वी व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पालक नसतील तर हे स्वप्न कसे प्रत्यक्ष येणार, असा प्रश्न करत त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न आहे. यासाठी खास मुलांकडून त्यांच्याच हस्ताक्षरात आई-बाबांसाठी पत्र लिहिण्याची नामी शक्कल पोलिसांनी लढविली आहे. शहरातील ३०० हून अधिक महापालिका, खासगी सर्व माध्यमांच्या शाळेत ‘पत्रलेखन’ स्पर्धेसाठी आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे किती गरजेचे, हेल्मेट-सीटबेल्टचा वापर या विषयावर विद्यार्थ्यांना लिहिते करण्यात आले आहे.

‘आई-बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात’

काही मुलांनी स्पर्धेत सहभागी होत निबंध लिहिण्यास सुरुवात केली. त्यात प्रिय आई, बाबा रोजच्या कामाच्या गडबडीत तुम्ही कामावर वेळेत पोहचावे म्हणून गाडी जोरात चालवितात. आम्ही फिरायला येतो, तेव्हा तुमची गाडी वेगात चालविण्याचे अवलोकन करतो. पण बाबा जर तुमच्या गाडीला अपघात झाला.. तुम्हाला कोणी मदत नाही केली तर, दवाखान्यात जाईपर्यंत काही विपरीत घडले तर.. या प्रश्नांची मालिका आम्हाला घाबरवते. तुम्ही आम्हाला हवे आहात. वाहतुकीचे नियम पाळल्यास हेल्मेट परिधान केल्यास, सीट बेल्टचा वापर केल्यास ही भीती कमी करता येईल. वाहन चालविताना ही काळजी घ्या, आम्ही तुमची वाट पाहतोय.. अशी असंख्य पत्रे चिमुकल्यांच्या लेखणीतून पुढे येत आहे. स्पर्धेतील ही पत्रे नंतर पालकांना देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांस आकर्षक पारितोषिकाने सन्मानित करण्यात येईल, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.