नाशिक : एरवी शहर परिसरात रिक्षाचालकांचा बेमुर्वतपणा, प्रवाशांशी होणारी अरेरावी नाशिककरांना नवी नाही, परंतु मुंबई येथील दाम्पत्यास नाशिकच्या रिक्षाचालकाकडून प्रामाणिकपणाचा सुखद धक्का बसला.

मुंबईतील जोगेश्वरी येथे राहणारे संदीप आमरे हे पत्नी ज्योतीसह सोमवारी औरंगाबाद रस्त्यावरील इंदू लॉन्स येथे लग्न कार्यासाठी आले होते. लग्न आटोपल्यानंतर मुंबईला परतण्यासाठी त्यांनी तेथूनच रिक्षा केली. बस स्थानक परिसरात उतरल्यानंतर सामान घेण्याच्या गरबडीत दागिने असलेली बॅग ते रिक्षेतच विसरले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत घटनास्थळी भेट दिली असता रिक्षाचालकाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचा वाहन क्रमांक समजल्यानंतर पंचवटी पोलिसांनी रिक्षाचालकाशी संपर्क साधण्याआधीच रिक्षाचालक संजय धोंगडे (रा.पंचवटी) यांनी आमरे यांच्याशी संपर्क साधला. आमरे यांना पंचवटी पोलीस ठाण्यात बोलावून घेत पोलिसांसमोर आमरे यांना त्यांची दागिन्यांनी भरलेली बॅग परत केली. धोंगडे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.