News Flash

रासबिहारी रस्त्यावर वाहतूक प्रचंड; त्रुटी उदंड

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील काही रस्त्यांच्या दुरुस्तीसह जोडरस्तेही तयार करण्यात आले.

अपघात रोखण्यासाठी रस्ता रुंदीकरण आवश्यक

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील काही रस्त्यांच्या दुरुस्तीसह जोडरस्तेही तयार करण्यात आले. परंतु, रस्ता दुरुस्ती योग्य पद्धतीने न झाल्याने अनेक रस्ते उंच-सखल अशा स्वरूपाचे झाले असल्याने अशा रस्त्यांवर सतत लहान-मोठे अपघात होत असतात. तर काही रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची गरज असताना तसे न करता  रस्ते ‘जैसे थे’ अवस्थेत ठेवून दुरुस्तीचा खटाटोप करण्यात आल्याने हे रस्ते अपघातांना आमंत्रण देत आहेत. शुक्रवारी एका महिलेचा बळी घेणारा मेरी, म्हसरूळ ते मुंबई-आग्रा महामार्ग यांना जोडणारा रासबिहारी रस्ता हा त्यापैकीच एक होय. प्रमाणापेक्षा अधिक वाढलेली वाहतूक आणि अरुंद व उंच-सखल अशी रस्त्याची अवस्था अपघातांना कारणीभूत ठरत आहे.

नाशिक शहराचा झपाटय़ाने विस्तार होत असताना वाढत्या वाहतुकीस सामावून घेण्यासाठी नववसाहतींमध्ये होणारे रस्ते योग्य तऱ्हेने होत आहेत. शहराच्या उपनगरांमध्ये ठिकठिकाणी जोडरस्ते तयार झाल्यामुळे शहरात येणारी वाहने या जोडरस्त्यांचा वापर करून शहरात न येताच परस्पर इच्छित स्थळी रवाना होत आहेत. यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी झाला असला तरी उपनगरांमध्ये वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. उपनगरांमध्ये काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले अनेक रस्ते वाढत्या वाहतुकीस सामावून घेण्यासाठी कमी पडू लागले आहेत. पंचवटीतील मेरी, म्हसरूळ आणि मुंबई-आग्रा महामार्ग यांना जोडणारा रासबिहारी रस्त्याची अवस्था अशीच झाली आहे. याआधी आडगाव, ओझरकडून कृषिमाल वाहून आणणारी वाहने आडगाव नाका, निमाणीमार्गे बाजार समितीकडे जात होती. या वाहनांमुळे निमाणी परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असे. रासबिहारी रस्ता तयार झाल्यानंतर कृषिमाल घेऊन येणारी वाहने या रस्त्याने बाजार समितीकडे जाऊ लागली. त्यामुळे या वाहनांमुळे निमाणी परिसरात होणारी वाहतूक कोंडीही काही प्रमाणात दूर झाली, शिवाय वाहनधारकांच्या खर्चात व वेळेतही बचत झाली. गुजरात, पेठ, दिंडोरीकडे जाण्यासाठी आडगाव, माडसांगवी, शिलापूर, ओढा या गावांना रासबिहारी रस्ता जवळचा झाला. निमाणीला वळसा घालून जाण्यापेक्षा या रस्त्याने थेट दिंडोरी किंवा पेठ रस्ता गाठता येऊ लागल्याने या रस्त्यावरील वाहतूक वाढली. त्यातच बाहेरगावहून येणारी व गुजरातकडे जाणारी मालवाहू वाहनेही नाशिकमध्ये शिरण्याचा त्रास नको म्हणून या रस्त्याचा वापर करू लागली. या रस्त्याच्या दुतर्फा निवासी तसेच व्यावसायिक बांधकामेही झपाटय़ाने वाढली. अजूनही वाढतच आहेत. पूर्वी कधीकाळी तुरळक वाहतूक होणाऱ्या या रस्त्यावरून आता हजारो वाहने धावत असतात. रस्त्याचे महत्त्व वाढले, परंतु त्या प्रमाणात रस्ता वाढलाच नाही.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती न करता केवळ डांबरीकरणाचा थर चढविण्यात आला. या रस्त्याचे मूळ दुखणे वेगळेच असताना तो सुंदर दिसेल यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने अपघातांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण आले नाही. खरे तर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची वाहतूक होणारा हा रस्ता असल्याने तो परिपूर्ण होणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीतील हा रस्ता सरळ नाही. या जोडरस्त्यावर तीन ते चार ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढते. याशिवाय या रस्त्याचे सपाटीकरण व्यवस्थित झालेले नाही. ठिकठिकाणी रस्ता उंच-सखल असल्याचे जाणवते. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्याने वाहन नेताना वेगळाच अनुभव येतो. या रस्त्याच्या या त्रुटी जोपर्यंत दुरुस्त केल्या जात नाहीत, तोपर्यंत या रस्त्यावरील अपघात थांबणार नाहीत. एखादा अपघात झाला की गतिरोधकाची मागणी करण्यात येत असते. परंतु त्यामुळे जो प्रमुख इलाज करणे आवश्यक आहे त्याकडे दुर्लक्ष होते. या रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:40 am

Web Title: huge traffic in rasbihari road in nashik
Next Stories
1 दारू उत्पादन करणारे साखर कारखाने बंद करावेत!
2 महावितरणची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची छगन भुजबळ यांची सूचना
3 जातपंचायतीविरोधात कठोर कायदा करणार – राम शिंदे
Just Now!
X