त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरुमहट्टीतील घटना
रागावरील नियंत्रण सुटल्यास क्षणार्धात परिस्थिती कशी बदलते याचा प्रत्यय मंगळवारी त्र्यंबकेश्वरवासीयांनी घेतला. तालुक्यातील मुरुमहट्टी येथे मुलीच्या हळदीच्या दिवशी वडिलांनी केलेली बेदम मारहाण मुलीच्या आईच्या जिवावर बेतली. उपचारादरम्यान मातेचा मृत्यू झाला असून संशयित फरार आहे. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरुमहट्टी गावात उत्तम राऊत हा पत्नी विमल आणि दोन मुलींसह वास्तव्यास आहे. सोमवारी उत्तमची मुलगी कविता हिचा मोखाडा तालुक्यातील कळंमगाव येथे हळदीचा कार्यक्रम होता. मंगळवारी तिचा विवाह होता. हळदीच्या कार्यक्रमाला जाताना उत्तम आणि त्याची पत्नी विमल यांच्यात काही कारणास्तव वाद झाला.
संतापलेल्या उत्तमने रागाच्या भरात विमलला बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी विमल राऊत यांचे निधन झाले. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, संशयित आरोपी असलेला पती आणि मृत पत्नी हे दोघेही व्यसनाधीन असल्याने त्यांच्यात नेहमीच वाद होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. एखाद्या कृत्यामागची भावना काही क्षणात उफाळून येऊ शकते; परंतु व्यसनाधीनता हे त्यामागचे आणखी एक कारण असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. फरारी आरोपीचा शोध सुरू आहे.