22 September 2020

News Flash

जनतेच्या सहकार्याशिवाय करोनावर नियंत्रण मिळविणे अशक्य

‘शून्य मोहीम’ उपक्रमाचे छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटनं

नाशिक येथे ‘मिशन नाशिक झिरो’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ, महापौर सतीश कुलकर्णी, खा. डॉ.भारती पवार, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जैन संघटनेचे शांतीलाल मुथा आदी.

‘शून्य मोहीम’ उपक्रमाचे छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटनं

नाशिक : मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक करोनाचे पुढील केंद्रबिंदू होत असून त्याला हद्दपार करण्यासाठी आता दृढनिश्चयाने प्रयत्न करावे लागतील. जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरू राहील. जनतेच्या सहकार्याशिवाय यावर नियंत्रण मिळविता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जैन संघटना, विविध सामाजिक संस्था आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन नाशिक झिरो’ या उपक्रमाचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते मंगळवारी महाकवी कालिदास कला मंदिरात झाले. या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी महापौर सतीश कुलकर्णी, खा. डॉ.भारती पवार, आ. देवयानी फरांदे आणि सीमा हिरे, पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जैन संघटनेचे शांतीलाल मुथा आदी उपस्थित होते. नाशिकमध्ये करोना नियंत्रणात आणण्यासाठी ‘शून्य मोहीम’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे, हे कौतुकास्पद असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. हे काम जबाबदारी आणि कष्टाने करावे लागणार आहे. करोना कोणाची जात बघत नाही. आपण मनुष्य आहोत याचा विचार करून जे मापदंड हा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित करून देण्यात आले आहेत, त्यांचे पालन करण्याची गरज आहे. सद्य:स्थितीत करोना हाच आपल्या सर्वाचा प्रतिपक्ष असून  सर्वाना करोनविरुद्ध एकत्र येऊन लढाई जिंकायची आहे. करोनाला घाबरून त्याचा सामना जग करू शकत नाही. या आजारामुळे माणूस माणसापासून दुरावतोय. त्यामुळे ही लढाई एक प्रकारे माणुसकीविरुद्धची लढाई समजूनच प्रत्येकाने त्यास तोंड द्यावयास हवे. समाजमाध्यमांचा वापर करून नागरिकांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवून मदत करण्याची गरज असून केवळ शासन आणि महापालिका यात यशस्वी होऊ शकत नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले. विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन, लोकसहभागातून आपण यावर मात करू शकतो. टाळेबंदी हा एकमेव पर्याय नसून तज्ज्ञांच्या मदतीने आपल्याला यावर उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर सतीश कुलकर्णी यांनी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करून शहराला दिलासा देण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात ४९ ठिकाणी फिरत्या रुग्णालयांच्या माध्यमातून तपासणी मोहीम राबविण्यात येत असून आतापर्यंत १६ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचे सांगितले. करोनाची भीती बाळगू नये, यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे. आता करोनासह आपल्याला जगायचंय यासाठी तशी मानसिकता तयार करून उपाययोजना करायला हव्यात. यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढे यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

आरोग्य सेवकांना चांगली वागणूक द्या

आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटना घडत असून नागरिकांनी आरोग्य सेवकांना चांगली वागणूक द्यावी तसेच यासाठी पोलीस यंत्रणेने यावर लक्ष द्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. राज्याच्या तुलनेत नाशिकमध्ये सर्वाधिक चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण शोधता आले आहेत. रुग्ण जरी वाढत असले तरी भरीव उपाययोजनाही करण्यात येत आहेत. सामाजिक सहभागातून करोनावर मात करण्यासाठी ‘शून्य मोहीम’ राबविण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात फिरत्या दवाखान्यांमार्फत मोहीम राबविली जाईल. प्रतिजन चाचण्यांद्वारे तपासणी केली जाईल. त्यातून रुग्णसंख्या वाढणार असली तरी घाबरण्याचे कारण नसल्याचे गमे यांनी सूचित केले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 5:09 am

Web Title: inauguration of zero campaign by chhagan bhujbal zws 70
Next Stories
1 टाळेबंदीने कापड उद्योगाची वीण उसवली..
2 Coronavirus : रुग्णसंख्या १० हजारांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर
3 दुधावरून महाविकास आघाडीला घेरण्याचा महायुतीचा प्रयत्न
Just Now!
X