विविध क्षमतेच्या तोफांमधून चाललेला भडिमार.. लाँचरमधून अचूक लक्ष्यभेद करणारी रॉकेट्स.. तोफगोळे व रॉकेट्सच्या अव्याहत माऱ्याने उजळलेला फायरिंग रेंजचा परिसर.. या माऱ्यावर लक्ष ठेवणारी वैमानिकरहित विमाने.. चिता व चेतक हेलिकॉप्टर्समधून झेपावलेल्या पॅराट्रपर्सच्या अवकाशातील कसरती.. आणि युद्धभूमीवर या सर्वाचे नियोजन करण्यात महत्त्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या ‘साटा’ अर्थात टेहेळणी व लक्ष्यनिश्चिती विभागाची अत्याधुनिक उपकरणे.. तोफखाना दलात समाविष्ट झालेल्या पिनाका, स्मर्च रॉकेट्स आणि ब्राह्मोस या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची माहिती.. भारतीय तोफखाना दलाच्या प्रहारक क्षमतेची अनुभूती शालेय आणि राष्ट्रीय छात्र सेना पथकातील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली. त्यास निमित्त ठरले, तोफखाना स्कूलच्यावतीने सोमवारी आयोजित ‘तोपची’ या खास प्रात्यक्षिकांचे. मोठय़ा संख्येने शालेय विद्यार्थ्यांना निमंत्रित करत स्कूलने या माध्यमातून तरुणाईला प्रतिष्ठेच्या लष्करी सेवेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
स्कूलचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. जॉर्ज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास वेलिंग्टनच्या ‘डिफेन्स सव्र्हिस स्टाफ’ महाविद्यालय आणि पुण्याच्या मिलिटरी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यंदाचे वैशिष्टय़ म्हणजे, विविध शाळांमधील तसेच राष्ट्रीय छात्र सेना पथकातील विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती. दरवर्षी या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येते. यंदा शालेय विद्यार्थ्यांना मोठय़ा संख्येने आमंत्रित करत स्कूलने लष्करी सेवेतील विविध संधी उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला.
तोफखाना स्कूलच्या गौरवशाली परंपरेला साजेशा पद्धतीने सकाळी मान्यवरांचे आगमन झाल्यावर मल्टि बॅरल रॉकेट लाँचरमधून रॉकेट दागून दिमाखदार पद्धतीने सलामी देण्यात आली. प्रात्यक्षिकांत विविध क्षमतेच्या तोफा व रॉकेट लाँचर सहभागी झाले असले तरी तोफखान्याच्या भात्यात अलीकडेच समाविष्ट झालेल्या पिनाका, ‘स्मर्च’ रॉकेट लाँचर्स आणि ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राची माहिती दिली गेली. स्मर्च वा पिनाकाचे प्रात्यक्षिक दाखविणे या फायरिंग रेंजवर शक्य नव्हते. त्याची मारक क्षमता ९० किलोमीटर असून कमी अंतराच्या रेंजवर प्रात्यक्षिके सादर करणे अवघड असल्याचे कारण होते. २९० किलोमीटरवर मारा करण्याची क्षमता असणारे सुपरसोनिक ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रही तोफखाना दलाकडे दाखल झाले असून त्याची केवळ प्रतिकृती सादर करण्यात आली. देवळाली कॅम्पलगतच्या फायरिंग रेंजवर सलग दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात तोफखाना दलाच्या भात्यातील तोफा व रॉकेट्सच्या कामगिरीचे दर्शन घडविण्यात आले. प्रारंभी, हेलिकॉप्टर व खेचरावरून मैदानात आणलेल्या तोफांच्या सुट्टय़ा भागांची जवानांनी काही मिनिटांत बांधणी केली. त्यानंतर सुरू झाला खऱ्या अर्थाने भडिमार. बोफोर्स तोफांनी आपले वेगळेपण अधोरेखित केले. एका मिनिटात आठ ते दहा स्मोक किंवा हाय एक्स्प्लोझिव्ह बॉम्बचा मारा करू शकणाऱ्या १२० एम.एम. मॉर्टर गनने प्रहारक क्षमता दाखविल्यानंतर १०५ एम.एम. इंडियन फिल्ड गन, लाइट फिल्ड गन यांनी भडिमाराचे कसब दाखविले. प्रत्येकीच्या क्षमतेनुसार डागलेले गोळे अवघ्या २० ते ४५ सेकंदांत लक्ष्यावर जाऊन आदळले. त्यानंतर रॉकेट लाँचरने एकापाठोपाठ एक केलेल्या फायरिंगने सर्वाना आश्चर्यचकित केले. तोफगोळ्यांच्या माऱ्याने फायरिंगचा रेंज परिसर अक्षरश: उजळून निघाला. दुसरीकडे डागलेल्या तोफगोळ्यांवर जमिनीवरून दिसू न शकणारी वैमानिकरहित विमाने लक्ष ठेवून होती. अचूक लक्ष्यभेद झाल्याची माहिती लगेच त्यांच्याकडून छायाचित्रांद्वारे उपलब्ध करून दिली गेली. फायरिंग रेंजच्या परिसरात चिता हेलिकॉप्टरने अगदी जमिनीलगत उडण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर चिता व ध्रुव हेलिकॉप्टरमधून पाच ते सहा हजार फूट उंचीवरून पॅराट्रपर्सने उडी मारून हवेतील कसरती सादर केल्या. तोफखाना दलाच्या टेहेळणी व लक्ष्यनिश्चिती विभाग अर्थात ‘सव्र्हिलन्स आणि टारगेट अॅक्विझिशन विंग’(साटा)कडून वापरल्या जाणाऱ्या लोरोज, एएनटीपीक्यू यांसारख्या टेहेळणी यंत्रणाही प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.

सैन्य दलात हजारो जागा रिक्त
विविध क्षेत्रांत आकर्षक नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याने आलिशान जीवनशैलीची भुरळ पडलेल्या नवयुवकांची प्रतिष्ठेच्या पण खडतर सेवा मानल्या जाणाऱ्या सैन्यदलात दाखल होण्याची ऊर्मी कमी होत असल्याचे निरीक्षण मध्यंतरी खुद्द संरक्षण विभागाने नोंदविले आहे. यामुळे भारतीय सैन्यदलास मनुष्यबळ तुटवडय़ास तोंड द्यावे लागत असून सद्य:स्थितीत लष्कर, नौदल व हवाईदलात अधिकारी व जवानांची एकूण ५० हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. कमी श्रमाच्या व झटपट श्रीमंती मिळवून देणाऱ्या जगात गुरफटलेल्या युवकांना सैन्यदलाकडे आकर्षित करण्यासाठी संरक्षण विभागाला लढाई लढावी लागत आहे. लष्करी सेवेकडे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तोपची सोहळ्यात शालेय व राष्ट्रीय छात्र सेना पथकातील विद्यार्थ्यांना निमंत्रित करून स्कूलने त्यांना या सेवेचे महत्त्व लक्षात आणून दिले. विद्यार्थी प्रात्यक्षिकाने भारावले.