दुर्गजागृती व्याख्यानमाला

छत्रपती शिवरायांचा काळ स्वराज्यासाठी झपाटलेल्यांचा होता. शिवरायांनी गनिमी कावा व आरमारी युद्धनीतीच्या बळावर शत्रूला धुळीस मिळवून अवघ्या सत्तावीस वर्षांच्या कारकीर्दीत स्वराज्य मिळवले. जे शिवरायांनी दिले ते आपण विसरलो. डोंगरी मार्गाने, समुद्रीमाग्रे येणारे दहशतवादी भारतात घुसतात. हल्ले करतात. आपण शिवरायांच्या दुर्गाची आणि समुद्री आरमाराची युद्धनीती विसरलो म्हणून असुरक्षित झालो आहोत, असे प्रतिपादन व्याख्याते सुनील पवार यांनी केले.

येथे सीबीएसजवळील शिव पुतळ्यासमोर शिवकार्य गडकोट मोहीम यांच्या वतीने आयोजित दुर्गजागृती व्याख्यानमालेत ‘शिवरायांची दुर्गे व त्यांची युद्धनीती’ या विषयावर पवार यांनी पाचवे पुष्प गुंफले. गनीम म्हणजे शत्रू आणि कावा म्हणजे शत्रूची हालचाल. हे जाणूनच शिवरायांनी औरंगजेबाच्या लाखोंच्या मुघली फौजेशी, तसेच पोर्तुगीज, डच या शत्रूंशी संघर्ष केला. त्यागाच्या बळावर देश उभा राहतो. त्यानुसार स्वराज्यासाठी अनेक निष्टावंतांनी बलिदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. गडकोट हे जलस्रोतांचे साठे आहेत. दुष्काळात ठणाणा करणाऱ्या शासनाला गडांवरील जलाशये दिसत नाहीत. नाशिकच्या ६८ गडकिल्ल्यांवर प्रत्येकी १० ते २० जलाशये आहेत. अशी एकूण एक हजारपेक्षा अधिक जलाशये कित्येक गावांची तहान भागवू शकतात. शिवरायांनी उभारलेले आरमार तसेच जलदुर्गाची केलेली उभारणी स्वराज्याच्या सुरक्षेसाठी गरजेची होती. शिवरायांनी आपल्या सुनेला ताराराणी यांना शस्रयुद्धनीती शिकवली. शंभूराजांनी शिवरायांचे स्वराज्य दक्षिणेपर्यंत वाढविले. बुंदेल खंडाचे राजे छत्रसाल यांनी शिवरायांचा आदर्श घेतला. आज सह्याद्रीच्या रांगेतील गडकोट दुर्लक्षित ठेवणाऱ्या राजकीय व सामाजिक शिक्षणात सत्ताधाऱ्यांना शिवरायांचा इतिहास टिकवता आला नाही, की इतिहास शिक्षणात आणता आला नाही, अशी टीका पवार यांनी केली.

नाशिकच्या भूमीवर झालेल्या लढाया, बलिदाने समजून घेतली पाहिजे. ते प्रयत्न दुर्ग जागृती व्याख्यानमालेतून होत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत अखंड दुर्गसंवर्धन करणाऱ्या शिवकार्य गडकोट मोहिमेच्या दुर्गसंवर्धन कार्यात आता समाजाने योगदान देण्याचे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर, स्वातंत्र्यसनिक वसंत हुदलीकर, प्रा. राजू देसले, प्रा. सोमनाथ मुठाळ, नेचर क्लबचे आनंद बोरा, कचरू वैद्य आदींसह शिवकार्य गडकोट मोहिमेचे संस्थापक अध्यक्ष राम खुर्दळ, मुख्य संयोजक योगेश कापसे उपस्थित होते. आभार भीमराव राजोळे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे भित्तिचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते.