दर कमी होण्याची चिन्हे

नाशिक : पाच ते सहा महिन्यांपासून घाऊक बाजारावर एकछत्री अंमल ठेवणाऱ्या उन्हाळ कांद्याची आवक दिवसागणिक कमी होत असून नव्या लाल कांद्याची आवक वाढत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. लासलगाव बाजार समितीत मंगळवारी सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याची साडेतीन हजार तर लाल कांद्याची अडीच हजार क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांद्याला सरासरी २६०० तर लाल कांद्याला २,७५० रुपये क्विंटल भाव मिळाला.

एक ते दीड महिन्यांपासून कांद्याच्या दरात चढउतार सुरू आहे. पाच ते सहा हजार रुपयांवर गेलेले भाव दिवाळीनंतर कमी होऊ लागले. पावसामुळे लाल कांद्याचा हंगाम महिनाभर लांबणीवर पडला. याचा लाभ उन्हाळ कांद्याला होण्याची शक्यता असताना केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी घालून परदेशातून कांदा आयात केला. यामुळे गेल्या वर्षीसारखे भाव क्विंटलला १० हजारांपर्यंत गेले नाहीत. मागील पंधरवड्यात नव्या लाल कांद्याची आवक अतिशय कमी होती. परंतु, त्यामध्ये आता वाढ होत असून चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात ३५०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर लाल कांद्याचे प्रमाण अडीच हजार क्विंटल होते. पुढील काही दिवसात लाल कांद्याची मोठी आवक होईल. त्यामुळे दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. अन्य बाजार समित्यांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी उन्हाळ कांद्याला २५०० रुपये

क्विंटल असा भाव होता. मागील आठवड्याप्रमाणे या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांदा दरात जवळपास ५०० रुपयांची घसरण झाली. सततच्या पडझडीमुळे कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला असला तरी यामुळे कांदा उत्पादक मात्र संकटात सापडले आहेत. दोन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी मनमाड बाजारपेठेत कांद्याची ४५६ ट्रॅक्टर इतकी प्रचंड आवक झाली. उन्हाळ कांद्याला १००० ते ३०९५ सरासरी २५०० रुपये क्विंटल असे भाव होते. तर लाल कांद्याला १६४३ ते ३३००, सरासरी २८०० रुपये क्विंटल भाव मिळाले. मकाची १९६ नग इतकी आवक झाली. त्यास १२११ ते १४२१, सरासरी १३०० रुपये क्विंटल दर मिळाले.

नवा लाल कांदा येण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणत आहे. आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे जाणकारांचे मत आहे. दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याचे दर हमखास वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी त्याची साठवणूक केली होती. मात्र दिवाळीनंतर सातत्याने कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येते. बाजार समितीत काही दिवसांत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.