३९ समित्यांना माहितीसाठी अंतिम मुदत

नाशिक : ९४ व्या साहित्य संमेलनानिमित्त जवळपास ३९ समित्या कार्यरत असून या समित्यांमधील सदस्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. अनेक समित्यांनी अद्याप त्यांच्या समितीतील अंतिम नावांची शिफारस आणि आवश्यक ते माहितीपत्रक भरून संयोजकांना पाठविलेले नाही. ही माहिती प्राप्त झाल्याशिवाय समिती सदस्यांना ओळखपत्र देता येणार नाही. त्यामुळे यासाठी आता २८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. या तारखेनंतर कोणत्याही समिती सदस्याचे ओळखपत्र तयार करणे शक्य होणार नसल्याचे सूचित करण्यात आले आहे.

करोनाकाळात होणारे मराठी साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संयोजकांनी विविध ३९ समित्या स्थापन के ल्या आहेत. प्रत्येक समितीवर  प्रमुख, उपप्रमुखांसह सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली. या सर्व समित्यांमध्ये तब्बल ६४४ सदस्य आहेत. बहुतांश समित्यांच्या कामकाजाने वेग घेतला आहे. समितीच्या बैठकांना गैरहजर राहणाऱ्यांना विनम्रपणे थांबविण्याचे सूचित करण्यात आले आहे.

या घडामोडीत सदस्यांची संख्या कमी-अधिक होऊ शकते. समितीला नेमून दिलेल्या कामासह निधी संकलनाची जबाबदारी सोपविली गेली आहे. सदस्यांनी संमेलनासाठी ५०० रुपयांची देणगी द्यावी आणि निधी संकलनात हातभार लावावा अशी संयोजकांची अपेक्षा आहे. सर्वच समित्या कार्यान्वित झाल्यामुळे अधिकारांसह जबाबदारीचे विकेंद्रीकरण झाले आहे. समिती प्रमुख आणि सदस्यांना संमेलनासाठी खास ओळखपत्र दिले जाणार आहे.

या सर्वांचे ओळखपत्र तयार करणे ही महत्त्वाची बाब आहे. परंतु अद्यापही अनेक समिती प्रमुखांनी आपल्या समितीतील अंतिम नावांची शिफारस आणि आवश्यक ते माहितीपत्रक भरून संयोजकांकडे पाठविलेले नाही. सर्व समिती प्रमुखांनी आपल्या समितीतील सर्व सदस्यांची माहिती २८  फेब्रुवारीपर्यंत साहित्य संमेलनाच्या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक समितीतील सदस्य आणि समिती प्रमुखांनी शिफारस केलेले सदस्य या सर्वांचे ओळखपत्र तयार करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी माहिती सादर करण्याची २८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. या तारखेनंतर कोणत्याही समितीतील सदस्यांचे माहितीपत्रक स्वीकारणे किंवा ओळखपत्र तयार करणे संमेलनाच्या इतर पूर्वतयारीमुळे आम्हाला शक्य होणार नाही. सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

– विश्वास ठाकूर (मुख्य समन्वयक)