शहरात कचरा संकलित करणारी घंटागाडी व्यवस्था डळमळीत होऊनही प्रशासन ठेकेदारावर कारवाई करीत नसल्याची आगपाखड सदस्यांनी केल्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेत या मुद्दय़ावरून सदस्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रशासन आणि घंटागाडी ठेकेदार यांच्या संगनमतामुळे ठेकेदारावर कारवाई होत नसल्याचा आक्षेप घेतला गेला.

स्थायी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते. सिडकोतील घंटागाडीच्या अनियमिततेच्या मुद्दय़ावर प्रवीण तिदमे, संतोष साळवे, दिनकर पाटील यांच्यासह अनेकांनी बोट ठेवले. अनियमिततेच्या मुद्दय़ावर घनकचरा व्यवस्थापन विभाग ठेकेदाराला केवळ दंड ठोठावते. त्या पलीकडे त्यांनी काही केले नाही. शहरात डेंग्यू, स्वाईन फ्लूसह साथीचे आजार बळावले असताना घंटागाडी वेळेवर येत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.

घंटागाडीवर बसवलेल्या जीपीएस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. घंटागाडीच्या करारनाम्यात १० टक्क दंड झाल्यास ठेका रद्द करण्याचे नमूद आहे. वार्षिक आढावा घेऊन त्या निकषानुसार ठेका थेट रद्द करता येईल.

परंतु, प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालते. महापालिकेविरोधात १०० कोटीचे दावे करणाऱ्या काळ्या यादीतील ठेकेदारांनी वेगवेगळ्या नावाने हे काम घेतल्याचा आक्षेप नोंदविला गेला. घंटागाडी केवळ सकाळच्या सत्रात फिरते. अनेक भागात ती जातदेखील नाही.

करारातील अटी-शर्तीनुसार घंटागाडीबाबत अहवाल तयार करून देणे आवश्यक आहे. संबंधिताच्या अहवालाची प्रत्यक्षात पडताळणी व्हायला हवी. कचरा बंदिस्त स्वरूपात वाहतूक व्हायला हवा. पण ठेकेदाराने कोणतीही घंटागाडी बंदिस्त केलेली नसल्याच्या तक्रारी करत सदस्यांनी  हा ठेका रद्द करण्याची मागणी केली.

आरोग्य अधिकाऱ्यांची उलट तपासणी घेताना सदस्यांनी संगणक विभागाच्या प्रमुखांनाही जाब विचारला. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थायी सभापतींनी स्थायी समिती स्वत:ची समिती नेमून घंटागाडीच्या अनियमिततेची चौकशी करणार असल्याचे सांगितले. या समितीच्या अहवालावरून घंटागाडीच्या ठेक्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

‘एक मुंढे परवडत नाही तर..’

पालिकेतील अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीबाबत चर्चा सुरू असताना नगरसेवक समीर कांबळे यांनी प्रशासन प्रभावीपणे कार्यरत होण्यासाठी पालिकेतील सर्व अधिकाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारखे होण्याची गरज मांडली. यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी इथे एक मुंढे परवडत नाही.. तर इतरांचे काय.. असे म्हटल्यावर सदस्यांना काय कळायचे ते समजले. दिनकर पाटील यांनी साहेब आमचे तुमच्याशी तात्त्विक वाद असून बाकी काही नाही, असे सांगितले. नगरसेवक ५० हजार लोकसंख्येच्या प्रभागातून निवडून आले आहेत. त्यांचा सन्मान व्हायला हवा, अशी सर्वाची अपेक्षा असल्याचे सांगितले.