तज्ज्ञांचे मार्गदर्शन; कीटकांसह पक्षी आणि वनस्पती पाहण्यांची संधी

कीटक हा पर्यावरणातील सर्वात महत्त्वाचा घटक, परंतु याबाबत समाजात अनेक गैरसमज आणि चुकीची माहिती पसरलेली आहे. नागरिकांपर्यंत कीटकांची योग्य माहिती पोहचण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक, नॉर्थ आणि ग्रेप काऊंटी बायोडायव्हर्सिटी पार्क यांच्या सहकार्याने १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता राज्यातील पहिलाच ‘कीटक आणि जैव विविधता महोत्सव’ भरविण्यात येत आहे. येथील त्र्यंबक रस्त्यावरील ग्रेप काऊंटी बायोडायव्हर्सिटी पार्क येथे होणाऱ्या जैव विविधता महोत्सवात पर्यावरणप्रेमींसाठी माहितीचा खजिना खुला होणार असल्याची माहिती रोटरीच्या मनीष ओबेरॉय यांनी दिली.

देशात आणि राज्यात पहिल्यांदाच असा नावीण्यपूर्ण जैव विविधता महोत्सव होत आहे. महोत्सवात विविध तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मधुमक्षिकातज्ज्ञ टी.बी. निकम, फुलपाखरू आणि पक्षीतज्ज्ञ डॉ. श्रीश क्षीरसागर, कीटकतज्ज्ञ अभिजित महाले मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी निकम हे सदरच्या विषयावरील माहितीपटाचे सादरीकरण करून संपूर्ण माहिती देणार आहेत. तसेच, निसर्गात असलेले पक्षी, कीटक, वनस्पतीशास्त्र यांची माहिती दिली जाणार आहे. यावेळी महोत्सवात ब्लॅक ड्रँगो, पेड बुशचॅट, जंगल मायना, ब्राह्मणी माइना, क्रेस्टेड लार्क, रुफस टेल लार्क, मॅग्पी रॉबिन, इंडियन रॉबिन, पर्पल सनबर्ड, रेड वॅटलेड लॅपिंग, लाफिंग डोव, एग्रीट्स आणि हेरॉन्स, किंगफिशर्स यांसारखे पक्षी, तसेच शिकार करणारे देखील पक्षी येथे पाहता येतील, असा दावा ग्रेपच्या किरण चव्हाण यांनी केला. तसेच निसर्गाने साथ दिली तर क्वचित दिसणारे इंडियन कोर्टर्स, पिवळ्यासारखे काही पक्षी, लॅपिंग, ग्रे फ्रँकॉलिन, बुशलाव पक्षी, काही ईगल प्रजाती आदींची उपस्थिती पाहायला मिळू शकते असे चव्हाण यांनी सांगितले.

याशिवाय विविध प्रकारचे कीटक ग्रासहूपर, कॅटेडिड्स, बिटल्स, ड्रॅगनफ्लाईज, डॅमस्लिज, बग्स, विविध फुलपाखरे, पतंग, मुंग्या, हनिबीज, वापास, प्रीईंग मांटिस,  वोकिंगस्टिक, वॉटर स्ट्रर्ड, एंटलायन, क्रिकेट आणि काही इतर प्रकारच्या माश्या, अ‍ॅफिड्स, सुरवंट, फुलपाखरे आणि किडे यांच्या अळ्या देखील पाहता येणार आहेत. पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी महोत्सवास हजेरी लावावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

जैव विविधतेची माहिती मिळेल

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण निसर्गापासून दुरावलो आहोत. रोज दिसणाऱ्या माश्या, कीटक, मुंग्या, पक्षी, वनस्पती यांची माहिती आपल्याला नसते. त्यांच्या जाती, रंग, पर्यावरणातील त्यांचे महत्त्व आदी गोष्टी समजून घेण्यासाठी हा उपक्रम रोटरी क्लबतर्फे राबविण्यात येत आहे. जैव विविधतेची खरी माहिती मिळावी हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे.

– मनीष ओबेरॉय (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ)