नाशिक : राज्यात ठिकठिकाणी करोनाचा वाढता फैलाव पाहता प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन  प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत येथील सराफ व्यावसायिकांनी पुढाकार घेतला. तीन दिवस  सराफ पेढय़ा बंद राहणार असून पहिल्या दिवशी बंदमध्ये पाच हजाराहून अधिक व्यावसायिक, कारागीर यांनी सहभाग घेतला आहे. बंदमुळे दिवसाला कोटय़वधीचे नुकसान होत असले तरी आरोग्याचा प्रश्न महत्वाचा आहे, अशी भूमिका व्यावसायिकांनी मांडली आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हिंदू नववर्षांचा पहिला दिवस गुढीपाडवा जवळ आला असून अनेकांकडून हा मुहूर्त साधण्यासाठी महिनाभर आधीच, तर महिनोमहिने नियोजन सुरू राहते. यंदा मात्र या नियोजनावर करोनाचे सावट आहे. जिल्ह्य़ात अद्याप करोना रुग्ण आढळला नसला तरी धोका कायम आहे. पुढील १० ते १५ दिवस सर्वाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने प्रशासनाने व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत महापालिका हद्दीतील सिडको, पंचवटी, नाशिकरोडसह सराफ बाजारातील एक हजार ५०० व्यावसायिक, दोन हजार बंगाली कारागीर, पॉलिश करणारे, अटनीवाले असे पाच हजाराहून अधिक व्यावसायिक आणि कारागीर बंदमध्ये सहभागी झाले आहेत. रविवापर्यंत बंद राहणार असून सोमवारी प्रशासनाचा आदेश आल्यास हा बंद बेमुदत राहील, अशी माहिती नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली. विशेष म्हणजे लगीनसराईचे दिवस असतानाही सराफ असोसिएशनने हा निर्णय घेतल्याने त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. दरम्यान, सणासुदीचा काळ असून नाशिक मधून जिल्ह्य़ालगत असलेल्या अन्य जिल्ह्य़ांमध्ये सोन्याचे व्यवहार होत राहतात. नाशिकचे सोने सर्वदूर जात असतांना बंदमुळे दिवसाला एक कोटीहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प होणार आहे.

कापड व्यावसायिकांचाही दोन दिवस बंद

नाशिक शहराच्या सर्व घाऊक तसेच किरकोळ कापड विक्रेत्यांनी शनिवार आणि रविवारी दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दुकानदारांकडे ग्राहकांना कपडे देण्याचे तातडीचे काम आहे. त्यांनी शनिवारी सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत ग्राहकांसाठी तात्पुरती व्यवस्था करावी. तसेच २१ मार्च रोजी परिस्थितीचा आढावा घेत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे दि नाशिक रिटेल क्लॉथ मर्चन्ट्स असोसिएशनच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.