आपण जलद न्यायाची मागणी करतो, पण हा न्याय वेळेत का होत नाही याचा विचार करणे गरजेचे आहे. अपुरे ज्ञान, दावे प्रतिदावे, न्याय व्यवस्थेवरील अन्य ताण याचा अडसर दुर झाला तर ही प्रक्रिया अधिक जलद होईल, असे प्रतिपादन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केले. महाराष्ट्र-गोवा वकील परिषद आणि नाशिक वकील संघ यांच्यावतीने येथे आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेचे उद्घाटन शनिवारी बोबडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी न्या. बोबडे यांनी न्यायदानाच्या वेगवेगळ्या आयामांचा वेध घेतला. न्यायदान करताना कोणी दुखावते हे मान्य, पण न्यायदान करताना कायद्याचे सखोल ज्ञान आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत तटस्थपणे काम करणे गरजेचे आहे. आपण जलद न्यायाची अपेक्षा ठेवतो, मात्र यामध्ये अनेक अडसर आहेत. खटला चालवितांना अपुरे पुरावे, दावे प्रतिदावे, याचिका याचा ताण असतो. न्यायालयात खटला उभा राहण्यासाठी वेळ जातो. देशात सर्व ठिकाणी या अडचणी आहेत. या पाश्र्वभूमीवर, वेगवेगळे चेंबर,

‘बेंन्च’ आणि कायदेविषयक ज्ञान देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये समन्वय गरजेचा आहे. विद्यार्थी दशेतच हे सखोल ज्ञान मिळाले तर या अडचणी राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अत्याधुनिक तंत्राचा अवलंब केला तर वेगवेगळे संदर्भ तपासत कामात गतिमानता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. न्यायदान प्रक्रियेत सर्व समान आहेत हे सर्वांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. ही समानता कशी निर्माण होईल यासाठी सर्वानी प्रयत्न करावे असे आवाहन न्या. बोबडे यांनी केले.