मराठा विद्या प्रसारक समाज संस्था प्रत्येक संकटसमयी नेहमीच माझ्या पाठीशी राहिली असून मी नाशिकचीच नव्हे, तर महाराष्ट्राची भाग्यवान कन्या आहे. हाच दुवा मला अधिक उंचीवर नेऊन ठेवणार, अशी अपेक्षा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली धावपटू कविता राऊत-तुंगार हिने व्यक्त केली.
मविप्र संचालित आयएमआरटी नाशिक या व्यवस्थापन संस्थेत आयोजित ‘अहॉय’ या सांस्कृतिक महोत्सवाचे बुधवारी संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात उद्घाटन झाले.
याप्रसंगी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते कविता राऊतला गौरविण्यात आले. त्याप्रसंगी तिने आपली भावना व्यक्त केली. यावेळी संस्थेचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, नाना महाले, संस्थेचे शिक्षणाधिकारी एस. के. शिंदे, क्रीडा संचालक प्रा. हेमंत पाटील, कविताचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग आदी उपस्थित होते. नीलिमा पवार यांना पुणे विद्यापीठाचा ‘जीवन साधना गौरव’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक आयएमआरटीचे संचालक डॉ. बी. बी. रायते यांनी केले. आभार प्रा. डी. जी. माने यांनी मानले.