कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर धास्तावलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकवर पूर्ण लक्ष केंद्रित केले असून, गत दहा दिवसांत त्यांचे झालेले दोन दौरे ही बाब अधोरेखित करत आहेत. शहरातील लांबलचक उड्डाणपूल आणि त्याखालील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करण्याची तयारी एल अ‍ॅण्ड टी कंपनीने दर्शविली आहे. या अनुषंगाने बुधवारी राज यांनी कंपनीचे अधिकारी व वास्तुरचनाकारांसमवेत या भागाची पाहणी केली. पुलाखालील जागेचा गैरवापर टाळण्यासाठी या ठिकाणी बगीचा, जॉगर पार्क आदी साकारण्याचे प्रयोजन आहे. या प्रकल्पासाठी ‘एल अ‍ॅण्ड टी’ने ‘सामाजिक दायित्व’ अर्थात सीएसआर अंतर्गत निधी देण्याचे मान्य केले आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीला साधारणत: दीड वर्षांचा कालावधी शिल्लक असताना मनसेने शक्य तितक्या लवकर विकासकामे मार्गी लावण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. सिंहस्थामुळे शहरातील रस्ते विस्तीर्ण झाले, नव्या पुलांची उभारणी झाली. विद्युतीकरण, वर्तुळाकार रस्ते आदींमुळे शहराचा चेहरामोहरा बदलला. या कामांच्या बळावर मनसे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीला सामोरी गेली. नाशिकमध्ये अवघ्या तीन ते साडेतीन वर्षांत मनसेने काय काम केले, याचे विपणन खुद्द राज यांनी प्रचार काळात ‘स्लाईड शो’मार्फत केले. तथापि, त्या निवडणुकीत मनसेचे इंजिन काही धावले नाही. आधीच्या तुलनेत जागांची कमालीची घसरण होऊन केवळ नऊ जागांवर विजय मिळाला. या निकालाने धास्तावलेल्या मनसेने नाशिक महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धडपड सुरू केली आहे. त्याचे प्रत्यंतर राज यांच्या लगोलग झालेल्या दौऱ्याने येत आहे. मागील आठवडय़ात राज यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना नाशिकमध्ये आणले होते. गंगापूर रस्त्यावरील प्रस्तावित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या जागेची पाहणी त्यांनी केली. या ठिकाणी दुर्मीळ शस्त्रास्त्रांचे संग्रहालय साकारले जाणार आहे. त्यासाठी शिवशाहिरांकडे असणाऱ्या दुर्मीळ शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात येईल.
या दौऱ्यापाठोपाठ लगेचच म्हणजे मंगळवारी सायंकाळी राज यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर साडेपाच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल साकारण्यात आला आहे. उड्डाण पुलाखालील जागेचा वाहनतळ, अनधिकृत विक्रेते वा तत्सम घटकांकडून वापर होऊन त्यास बकालपणा प्राप्त होऊ नये म्हणून ही जागा विकसित करण्याचा राज यांचा प्रयत्न आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून त्यांनी ही जागा आधीच त्या पद्धतीने विकसित करण्यावर शिक्कामोर्तब करवून घेतले. नाशिक महापालिका, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम करणारी एल अ‍ॅण्ड टी यांच्या सहकार्यातून हे काम पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. कंपनी सीएसआर अंतर्गत निधी उपलब्ध करणार आहे. राज यांनी कंपनीचे अधिकारी, वास्तुरचनाकार, महापौर अशोक मुर्तडक यांच्यासमवेत या पुलाची पाहणी केली. पुलाच्या खालील भागासह वरील भागाचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. उड्डाणपूल काही भागात सव्‍‌र्हिस रस्त्याला समांतर आहे. तो भाग वगळता ज्या ठिकाणी पुलाखाली मोकळी जागा उपलब्ध आहे, तिथे शोभिवंत झाडे, बगिचा, जॉगर्स पार्क असे काय करता येईल याबद्दल चर्चा करण्यात आली. प्राप्त झालेल्या विविध संकल्पनांचा विचार करून रचना तयार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकल्पासाठी गरवारे पॉइंट ते द्वारका आणि नवीन आडगाव नाका ते द्वारका अशा दोन भागात या रचनेचे काम करण्यात येईल.
उड्डाण पुलाखालील आणि वरील जागा, शहरातील वाहतूक बेट आणि बगिचांमध्ये कोणकोणत्या शोभिवंत झाडांची लागवड करता येईल, यासाठी राज यांनी सातपूर येथील एका नर्सरीलाही भेट दिली. सध्या प्रगतिपथावर असलेल्या आणि प्रस्तावित वाहतूक बेटांच्या जागेची पाहणी राज यांनी केली. मनसे अध्यक्षांचे अचानक वाढलेले नाशिक दौरे आगामी निवडणुकीच्या धडपडीचे संकेत देत आहेत.