21 October 2018

News Flash

गोंधळात ‘एलईडी’ मंजूर

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत विभागनिहाय विकास प्रकल्पांतर्गत ३५०० एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत.

नाशिक महापालिकेच्या सभागृहात उडालेला गोंधळ. 

भाजपकडून ठेकेदारांचं चांगभलं करण्याचा आरोप

काही वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पथदीपांवर एलईडी दिवे बसविण्याच्या प्रस्तावाला विरोधी पक्षांचा विरोध डावलून गोंधळात सत्ताधारी भाजपने मंजुरी  दिली. या विषयावर जवळपास १५ मिनिटे  गोंधळ  सुरू  होता. एलईडी  दिव्यांना मान्यता देऊन सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराचे हित जोपासल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर भाजपने स्मार्ट सिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत होणार असल्याचे सांगत समर्थन केले.

महापालिका हद्दीतील सहा मीटर आणि साडे सात मीटर रुंदीचे सर्व रस्ते नऊ  मीटपर्यंत रुंद करणे, शहरातील स्वच्छतेच्या कामांसाठी आऊटसोर्सिगद्वारे ७०० सफाई कामगारांची भरती, १२ हजार ६०२ एलईडी फिटिंगच्या कामास मान्यता असे अनेक प्रस्ताव सर्वसाधारण सभेत चर्चेला येणार असल्याने ही सभा वादळी ठरणार असल्याचे आधीच अधोरेखित झाले होते. एरवी ११ वाजता असणारी सभेची वेळ दुपारी दोन करण्यात आली. महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या सभेत शिवसेनेने सभेच्या बदललेल्या वेळेवर आक्षेप घेऊन महत्वाच्या विषयांवर चर्चेसाठी पुरेसा  वेळ  मिळणे आवश्यक असल्याकडे लक्ष वेधले. याआधी १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरातील सर्वच ७० हजार पथदीपांवर एलईडी दिवे बसविण्याचा विषय मंजूर झाला होता. वाढीव दराने ते काम दिल्यावरून तो विषय न्यायप्रविष्ठ झाला. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत विभागनिहाय विकास प्रकल्पांतर्गत ३५०० एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत.

शहरातील ८६ हजार ९८० पथदीप जुन्याच दिव्यांवर असल्याने महापालिकेने ते स्वत:च्या खर्चाने बसविण्याची तयारी करत हा प्रस्ताव सादर केला. कोटय़वधी रुपयांच्या या खर्चाला शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने विरोध दर्शविला.

महापालिका केवळ ठेकेदारांचे हित जोपासत असल्याचा आरोप करत या प्रस्तावाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. प्रस्तावाच्या समर्थनार्थ भाजपचे सदस्य मैदानात उतरले. एलईडी दिव्यांमुळे मोठी वीज बचत होईल. दर महिन्याला भरावे लागणारे भरमसाठ वीज देयकातून सुटका होणार असल्याचे मुद्दे मांडण्यात आले. सभागृहात गोंधळ सुरू असताना महापौरांनी या प्रस्तावाला मान्यता दिली जात असल्याचे जाहीर केले.

सुधाकर बडगुजर- दिनकर पाटील यांची खडाजंगी

प्रस्तावावर शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आपले म्हणणे मांडत होते. त्यावेळी भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील अन्य नगरसेवकांसोबत चर्चा करत होते. यावेळी झालेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून बडगुजर आणि पाटील यांच्यात वादंग उडाले. दोघांनी परस्परांवर आगपाखड केली. आवाज टिपेला पोहोचला. दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, १५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता.

First Published on January 11, 2018 2:00 am

Web Title: led lights proposal nashik municipal corporation