अनिकेत साठे

बँकेच्या सूचनेप्रमाणे कर्जाचे हप्ते तीन महिने थांबविण्याची लेखी विनंती केली होती. पण, वेतन खात्यातून कर्जाची रक्कम कापण्यात आली. याविषयी बँकेकडे अनेकदा विचारणा केली. परंतु, कापली गेलेली रक्कम दुसरा महिना उजाडूनही परत मिळालेली नाही. बँक पुन्हा तो कित्ता गिरविण्याची धास्ती होती. यामुळे दुसऱ्या महिन्यात हप्ता भरण्याचा दिवस येण्याआधीच वेतन खात्यातून रक्कम काढून घेतली.

बँकांमध्ये वेतन खाते असणाऱ्या काही कर्जदारांना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, जाहीर झालेल्या कर्ज मुदतवाढीचा लाभ होण्याऐवजी तोटा झाल्याचे चित्र आहे. कर्जहप्ता स्थगित करून जे पैसे खर्चायला मिळणार होते, तेच बँकेच्या इलेक्ट्रॉनिक व्यवस्थेतून कापले गेले. वेळेत परतावाही मिळाला नाही. आज बँकेच्या लेखी हे कर्जदार मुदतवाढ योजनेतील आहेत. परंतु, पहिल्या कर्जहप्त्याची ती रक्कम त्यांना वापरायला मिळाली नाही. रिझव्‍‌र्ह बँकेने टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, एक मार्च ते ३१ मे २०२० या कालावधीत फेडल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मुदत कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती देण्याची मुभा दिली होती.

टाळेबंदीत आर्थिक अरिष्ट कोसळले. यातून कर्जदारांना काहीशी उसंत देण्याचा प्रयत्न होता. सर्व वाणिज्य, स्थानिक, प्रादेशिक, सहकारी बँकांसह वित्तीय संस्था, गृह वित्त कंपन्यांनी ही सुविधा कर्जदार ग्राहकांना उपलब्ध करण्यास सांगण्यात आले होते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या सूचनेनुसार सर्वच बँकांनी ग्राहकांच्या मागणीनुसार ती सुविधा उपलब्धदेखील केली आहे. जवळपास दोन महिने उद्योग-व्यवसाय बंद राहिल्याने आणि पगारदारांच्या वेतनात कपात झालेली असल्याने कर्ज हप्त्याचे समीकरण जुळविणे अनेकांसमोरील आव्हान आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केलेल्या योजनेचा काही कर्जदारांना बँकेतील तांत्रिक अडचणी, मनुष्यबळाची कमतरता आदीमुळे लाभ मिळाला नसल्याची उदाहरणे उघड होत आहेत. खासगी बँकेतून वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या एका ग्राहकाने कर्जहप्त्यास स्थगिती देण्याची मागणी नोंदविली. बँकेने ती मान्य झाल्याचे कळविले. परंतु, संबंधिताच्या खात्यातून एप्रिलच्या प्रारंभीच ६७१४ रुपयांची रक्कम कर्ज खात्यात वळती झाली. या संदर्भात विचारणा केल्यावर १७ एप्रिलपर्यंत या रकमेचा परतावा मिळेल, असे सांगितले गेले. परंतु, या मुदतीला महिना उलटूनही कपात झालेल्या हप्त्याची ती रक्कम संबंधितास परत मिळालेली नाही.

अनेक ग्राहकांना टाळेबंदीत आर्थिक झळ सोसावी लागली. मे महिन्यात बँक याच प्रकारे पुन्हा कर्ज हप्ता कापून घेईल, या धास्तीतून काहींनी वेतन खात्यातील शिल्लक रक्कम हप्त्याची तारीख येण्यापूर्वीच काढून घेतल्याचे सांगितले. बँकेत मनुष्यबळ कमी आहे. काही बँकांचा संपूर्ण कारभार ऑनलाइन चालतो. बँकेत प्रत्यक्ष चौकशी करूनही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याच्या काही कर्जदारांच्या तक्रारी आहेत.

मुळात बँका ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणतेही कर्जहप्ते स्थगित करू शकत नाही. सुरुवातीच्या काळात ग्राहकाने कर्ज स्थगितीची विनंती केली आणि लगेचच हप्त्याची तारीख असल्यास ती रक्कम कपात झालेली असेल. तांत्रिक कारणास्तव हे घडले. कपात केलेली ही रक्कम बँकेने संबंधितास परत करायला हवी. जिल्ह्य़ातील कोणत्याही बँकेने या पद्धतीने कापलेली रक्कम ग्राहकाला अद्याप मिळालेली नसल्यास त्यांनी अग्रणी बँकेकडे संपर्क साधावा.

– आर. शेखर ,प्रमुख, बँक ऑफ महाराष्ट्र अग्रणी बँक, नाशिक