जिल्ह्य़ातील १२ केंद्रांवरील सर्व जबाबदारी महिलांकडे

नाशिक : मतदान केंद्रासमोर काढलेली रांगोळी.. प्रवेशद्वारावर लागलेली रंगीत फुले..आकर्षक सजावट असा डामडौल पाहून अनेक मतदारांना आपण चुकून लग्नाच्या ठिकाणी तर आलो नाही ना, अशी शंका वाटली. परंतु, सखी मतदान केंद्र असल्याने हे सर्व नेपथ्य करण्यात आल्याचे कळल्यानंतर मतदारांनीही असे स्वागत सर्वच केंद्रांवर झाल्यास टक्केवारी निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्य़ात १२ ठिकाणी अशा केंद्रांवरील सर्व जबाबदारी महिलांनीच पेलली. केंद्रावरी निवडणुकीच्या कामकाजासाठी, सुरक्षा व्यवस्थेसाठी ‘महिला राज’चा अनुभव मतदारांनी घेतला.

महिला मतदारांवर निवडणूक प्रक्रियेविषयी असणारे दडपण दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने सखी केंद्र ही संकल्पना मांडली. या केंद्राची सर्व जबाबदारी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांवर देण्यात आली. जिल्ह्य़ात नांदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कळवण येथील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल, चांदवड येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, येवला येथील उर्दू गर्ल्स हायस्कूल, निफाड येथील वैनतेय विद्यालय, दिंडोरी येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालय, सिन्नर येथील

चांडक कन्या विद्यालय, नाशिक पूर्वमध्ये पुणे विद्यार्थी गृहाचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नाशिक मध्य भागात मराठा हायस्कूल, नाशिक पश्चिमसाठी नवजीवन विद्यालय, देवळाली येथील धोंडी रोड परिसरातील देवळाली हायस्कूल, इगतपुरीच्या टिटोली परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली. केंद्रावर निरीक्षक, केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, द्वितीय मतदान केंद्र अधिकारी, यादी पाहणी, पोलीस बंदोबस्तही महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा होता.

सखी केंद्राने आपले वेगळेपण जपत आपल्याला मिळालेल्या केंद्राची स्वच्छता करून ते सजविले. रांगोळीव्दारे मतदारांचे स्वागत करण्यात आले. मतदान केंद्रावर फुले आणि फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. काही ठिकाणी पडदा, फुलांच्या कमानीने केंद्राची ओळख करून देण्यात आली. महिला कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत डोक्यावर फेटे घातले होते. प्रसन्न वातावरणाची निर्मिती केल्याने मतदारांनाही या ठिकाणी मतदानासाठी लावलेली रांग कंटाळवाणी वाटली नाही.