जवळपास अडीच महिन्यांपासून गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकमध्ये शनिवारी चार अंश या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड तालुक्यात पारा तीन अंशापर्यंत खाली घसरला. अकस्मात परतलेल्या थंडीने संपूर्ण जिल्हा गारठला आहे. उघडय़ावर वास्तव्य करणाऱ्या दोन जणांचा मृत्यू झाला. देशातील बहुतांश भागात हीच स्थिती असल्याने त्याचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसत आहे. थंडीमुळे देशांतर्गत बाजारात द्राक्षांना मागणी नाही.  नाशिकमधून फेब्रुवारीच्या प्रारंभी थंडी निरोप घेण्याच्या मार्गावर असताना दोन दिवसात पारा पुन्हा एकदा खाली उतरला. शुक्रवारी ९.८ अंशावर असणारे तापमान या दिवशी ५.८ अंशांनी कमी झाले. उत्तर भारतातील वातावरणाचा हा परिपाक आहे. दिवाळीनंतर गारव्याचे अस्तित्व जाणवत होते. काही दिवसांचा अपवाद वगळता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत ही स्थिती कायम राहिली. या हंगामात थंडीने सर्वाधिक काळ मुक्काम ठोकण्याचा विक्रम केला. डिसेंबरच्या अखेरीस ५.१ या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. फेब्रुवारीच्या प्रारंभी वातावरणात बदल झाले. यामुळे थंडी निरोप घेत असल्याचे जाणवू लागले. गारवाही कमी झाला. थंडीतून सुटका झाल्याचे वाटत असताना तिचे पुनरागमन झाले. सध्या वाऱ्याचा वेगही अधिक आहे. थंडगार वाऱ्याने सर्वाना हुडहुडी भरली. गोदावरी काठावर उघडय़ावर वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. संबंधितांची ओळख पटलेली नाही. अंदाजे ६५ आणि ६० असे त्यांचे वय आहे. थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अंदाज असल्याचे पोलीस हवालदार धनराज पाटील यांनी सांगितले. बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत.