27 September 2020

News Flash

पावसाच्या दणक्यानंतर महावितरणचा मान्सूनपूर्व कामांना वेग

पावसाच्या दणक्याने वीज कंपनीला जाग आली असून पावसाळापूर्व कामांना वेग देण्यात आला आहे.

पहिल्याच वादळी पावसात शहरातील वीजपुरवठा व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला असून त्याची पुनरावृत्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री शहरातील काही भागांत झाली. अनेक भागात दहा तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले. आदल्या दिवशी विस्कळीत पाणी पुरवठय़ानंतर दुसऱ्या दिवशी रात्र अंधारात काढण्याची वेळ आली. वादळी पावसाने वीज वितरण व्यवस्थेतील सामग्रीचे नुकसान झाले. मनुष्यबळाअभावी वीजपुरवठा सुरळीत करताना महावितरणची दमछाक होत आहे. पावसाच्या दणक्याने वीज कंपनीला जाग आली असून पावसाळापूर्व कामांना वेग देण्यात आला आहे.
शहर परिसरासह जिल्हय़ात रविवार आणि सोमवारी काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. वळवाच्या पहिल्याच पावसाने वीज वितरण व्यवस्था कोलमडली. विजांच्या कडकडाटासह वादळ वारा यामुळे अनेक ठिकाणी तारा तुटल्या.
काही ठिकाणी झाडे तारांवर पडल्यामुळे या नुकसानीत भरच पडली. यंत्रातही काही अंशी बिघाड झाल्याने शहर परिसरात बहुतांश भागात वीजपुरवठा गायब झाला. त्याचा विपरीत परिणाम पाणीपुरवठा व्यवस्थेवर झाला असताना सोमवारी रात्री त्याची पुनरावृत्ती झाली.
उकाडा कायम असल्याने वीज गायब या विचारानेही अनेकांना घाम फुटतो. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ही परिस्थिती काही ठिकाणी कायम आहे. नागरिक याबाबत वीज वितरण तक्रार क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. तर तो क्रमांक संपर्क कक्षाच्या बाहेर किंवा सतत व्यस्त असतो. साधी तक्रारही घेतली जात नाही. काही ठिकाणी दूरध्वनी उचलून हा परिसर आमच्या अखत्यारीत नसल्याचे सांगत बोळवण होते. बऱ्याचदा परिसरात काही भागात वीज असते तर काही भाग अंधारात बुडालेला असतो. याबाबत विचारणा केल्यास अध्र्या एक तासाने वीज वितरणचे कर्मचारी त्या ठिकाणी केवळ ‘टॉर्च’ हाती घेऊन येतात. जागेची पाहणी करतात आणि मोठा बिघाड आहे हे तिकडूनच होईल, असे सांगून निघून जातात.
राजरत्ननगर परिसरात सोमवारी हलक्या पावसाने रात्री अकराच्या सुमारास वीज गायब झाली. झाड तारांवर पडल्याने तारा तुटल्या. यामुळे ठिणग्या उडण्यास सुरुवात झाली. कामगार वस्तीच्या परिसरात घरासमोर वाहने लावलेली होती.
वीज तारांमुळे काही अनर्थ होईल, अशी सर्वाना धास्ती वाटायला लागली. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर वीज कर्मचारी आले. त्यांच्यासमोर ठिणग्या उडण्याचा प्रकार घडला. कर्मचाऱ्यांनी पाहणीचा फार्स आटोपत काढता पाय घेतल्याची तक्रार स्थानिकांनी केली. राणेनगर परिसरात हलक्या पावसाच्या सरीने दीड तासांहून अधिक काळ वीज गायब होती.
या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी रविवारच्या पावसामुळे तसेच वादळ वाऱ्याने ‘इन्स्ट्रक्टर’मध्ये पाणी गेल्यामुळे यंत्रसामुग्रीत बिघाड झाल्याचे सांगितले. यामुळे शहरासह जिल्ह्य़ातील वीज वितरणावर त्याचा वितरीत परिणाम झाला आहे. सगळा विद्युतपुरवठा खंडित झाला. तो पूर्ववत करण्यात दोन दिवस गेले. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या पाश्र्वभूमीवर, पावसाळा पूर्व कामे हाती घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 3:05 am

Web Title: mahavitaran accelerate pre monsoon works
टॅग Mahavitaran
Next Stories
1 कामयानी, नंदीग्राम एक्स्प्रेस लासलगावला थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल
2 सटाण्यात सिलिंडर स्फोटामुळे अग्नितांडव
3 भाऊसाहेबच्या लॉकरमध्ये दोन कोटींची सोन्याची नाणी
Just Now!
X